नवी दिल्ली : न्यायपालिकेनेही आता तंत्रज्ञानाची कास धरली आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात बदल करणाऱ्या व्हॉट्सॲॅपचा वापर आता सुप्रीम कोर्टही करणार आहे. सुप्रीम कोर्ट आता व्हॉट्सॲॅपवर वकिलांसह सूचीबद्ध प्रकरणांशी संबंधित माहिती सामायिक करणार आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी ही घोषणा केली.
सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील नऊ न्यायाधीशांचे घटनापीठ एका याचिकेवर सुनावणी करत होते. त्याचवेळी सरन्यायाधीशांनी सांगितले की, सुप्रीम कोर्टाने ७५ व्या वर्षात व्हॉट्सॲॅपवरून माहिती देण्याचे अभियान सुरू केले. याअंतर्गत न्यायाशी संबंधित सेवा सुलभपणे देण्यासाठी व्हॉट्सॲॅपला सुप्रीम कोर्टाच्या माहिती तंत्रज्ञान सेवेसोबत समन्वयित केले जाईल. आता वकिलांशी संबंधित प्रकरणे व सूचीबद्ध प्रकरणांची माहिती व्हॉट्सॲॅपवर मिळतील. कोणत्या दिवशी कोणत्या प्रकरणाची सुनावणी होणार आहे याची माहिती दिली जाणार आहे.
सरन्यायाधीशांनी सुप्रीम कोर्टाचा अधिकृत व्हॉट्सॲॅप क्रमांक जाहीर केला. 87676-87676 या क्रमांकावर कोणताही कॉल किंवा संदेश पाठवता येणार नाही. या पद्धतीमुळे कामकाजात मोठे बदल होणार आहेत.