रणवीर अलाहाबादियावर SCचे ताशेरे; मात्र, अटकेपासून अंतरिम संरक्षण: "आई-वडील, बहीण, समाजाला लाज वाटेल,असे शब्द"

‘इंडियाज गॉट लेटेंट’ या यूट्यूब शोमध्ये आक्षेपार्ह टिप्पणी करणारा पॉडकास्टर रणवीर अलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले. मात्र, या व्यक्तीच्या मनात काहीतरी घाणेरडे आहे.
रणवीर अलाहाबादियावर SCचे ताशेरे;  मात्र, अटकेपासून अंतरिम संरक्षण: "आई-वडील, बहीण, समाजाला लाज वाटेल,असे शब्द"
Published on

नवी दिल्ली : ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या यूट्यूब शोमध्ये आक्षेपार्ह टिप्पणी करणारा पॉडकास्टर रणवीर अलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले. मात्र, या व्यक्तीच्या मनात काहीतरी घाणेरडे आहे. तुझे शब्द पालकांना आणि बहि‍णींना लाज वाटतील असेच आहेत. संपूर्ण समाजाला याची लाज वाटेल, अशा शब्दात न्यायालयाने अलाहाबादियाला मंगळवारी फटकारले.

गुन्हे रद्द व्हावेत आणि सर्व याचिका क्लब व्हाव्यात याकरता रणवीर अलाहाबादियाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. रणवीर अलाहाबादियाने केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीविरोधात महाराष्ट्र आणि आसामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याविरोधात त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर जोरदार ताशेरे ओढले.

न्यायालयाने म्हटले आहे की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली समाजाच्या नियमांविरोधात बोलण्याचा कोणालाही परवाना मिळालेला नाही. ही अश्लीलता नाही तर ते काय आहे, आम्ही तुझ्याविरुद्धचे एफआयआर रद्द का करावेत किंवा एकत्रित का करावेत, असा प्रश्नही सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे. न्यायमूर्ती सूर्य कांत आणि एन. कोटीश्वर सिंह यांनी अलाहाबादियाचा पासपोर्ट ठाणे पोलिस स्टेशनमध्ये जमा करण्याचे, तसेच त्याला न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय भारतातून बाहेर जाता येणार नाही, असे निर्देश दिले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर कोणालाही सामाजिक मूल्यांच्या विरोधात काहीही बोलण्याची मोकळीक नाही. समाजाची स्वतःची काही मूल्ये आहेत. समाजाची आपली कक्षा आहे आणि तुम्ही त्याचा आदर केला पाहिजे, अशा शब्दात न्यायालयाने रणवीर अलाहाबादियाला खडसावले.

सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहाबादियाबद्दल टिप्पणी केली की, असे दिसतेय की, त्याच्या डोक्यात काही घाण भरलेली आहे आणि त्यामुळेच त्याने शोमध्ये अशा प्रकारचे विधान केले. अशा प्रकारच्या वर्तणुकीची निंदा केली गेली पाहिजे. हे सहन न होण्यासारखे आहे. स्वत:ला तो खूप प्रसिद्ध आहे असे समजतो आणि म्हणून तो कोणतेही शब्द बोलू शकतो, असे त्याला वाटते, मग तो संपूर्ण समाजाला हलक्यात घेत आहे का, पृथ्वीवर कुणी आहे का, ज्याला ही भाषा आवडेल, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केला.

कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या एका भागात अलाहाबादियाने तुच्छ विनोद करत लोकांचे लक्ष वेधले. त्याच्या या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे संतापाची लाट उसळली आणि महाराष्ट्र व आसामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. हा शो मर्यादित प्रेक्षकांसाठी होता, परंतु क्लिप्स व्हायरल झाल्या, त्यामुळे प्रतिक्रिया तीव्र झाल्या. टीका वाढत असताना अलाहबादियाने जाहीर माफी मागितली आणि कबूल केले की त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तर, समय रैनाने त्याच्या युट्यूबवरील सर्व व्हिडिओही हटवले आहेत.

निर्बंधांचे सूतोवाच

न्यायालयाने यावेळी ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर दाखवल्या जाणाऱ्या अश्लील मजकुरावर निर्बंध आणण्याबाबत टिप्पणी केली. तसेच, यासंदर्भात केंद्र सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असेही न्यायालयाने यावेळी नमूद केले. ही संबंधित यूट्यूबरबाबतच्या प्रकरणाची सुनावणी आहे. या प्रकरणात केंद्र सरकारदेखील प्रतिवादी आहे. आपल्याला यावर काहीतरी करायला हवे. जर केंद्र सरकार स्वत:हून याबाबत काही करणार असेल, तर आम्हाला खूप आनंद होईल. नाहीतर निश्चित निर्बंधांचा हा अभाव आम्ही असाच सोडून देणार नाही.

कोर्टाची केंद्र सरकारला नोटीस

यूट्यूबर्स आणि यूट्यूब चॅनल्सकडून त्याचा गैरफायदा घेतला जात आहे. आम्ही सरकारला याबाबत नोटीस जारी करीत असून, सॉलिसिटर जनरल आणि ॲटर्नी जनरल यांनी सुनावणीच्या पुढच्या तारखेवेळी न्यायालयात हजर राहावे. आम्हाला यावर काहीतरी करायचे आहे. या प्रकरणाचे महत्त्व आणि संवेदनशीलतेकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही, असे न्यायमूर्तींनी यावेळी नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in