

नवी दिल्ली : साखर, मीठ किंवा चरबीचे प्रमाण जास्त असलेल्या पाकीटबंद खाद्यपदार्थांवर ठळक इशारा देणारी लेबल्स लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिले. प्रत्येक पोषक घटकासाठी स्वतंत्र षटकोनी चिन्ह (हेक्सागॉन) असावे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. एकाच चिन्हात सर्व घटकांचा उल्लेख करण्याची प्रस्तावित व्यवस्था उद्देशाला बाधा आणणारी असल्याचे नमूद करत न्यायालयाने ती सपशेल फेटाळली.
प्रत्येक घटकासाठी स्वतंत्र षटकोनी चिन्ह लावण्यात यावे. त्यावर ‘हाय फॅट, ‘हाय शुगर किंवा ‘हाय सॉल्ट, असा मजकूर आणि संबंधित चित्रचिन्ह असावे, असे निर्देश न्यायालयाने दिले. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) प्रस्तावित केलेल्या चार महिन्यांच्या कालावधीत नियम लागू करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देशही खंडपीठाने दिले. अंतिम अधिसूचना जारी झाल्यानंतर कंपन्यांना नवीन लेबलिंग व्यवस्था लागू करण्यासाठी ३६५ दिवसांची मुदत मिळणार आहे.
न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने १३१ पानांच्या निर्णयात एफएसएसएआयला प्रस्तावित इशारा लेबल योजनेतील रचना आणि पोषक घटकांच्या मर्यादांमधील त्रुटी दूर करण्याचे निर्देश दिले. चिप्स, बिस्किटे, शीतपेये यांसह विविध पाकीटबंद खाद्यपदार्थांवर आता कंपन्यांना संबंधित उल्लेख करावाच लागणार आहे.
न्यायालयाने एफएसएसएआयच्या प्रस्तावातील पोषक घटकांच्या मर्यादांवरही आक्षेप घेतला. उत्पादनातील ‘अॅडेड शुगर’आणि नैसर्गिक साखर प्रयोगशाळेत वेगळी ओळखणे शक्य नसल्याने अशा निकषांची अंमलबजावणी कठीण होईल. फळांच्या अर्काचा वापर करून कंपन्या इशारा टाळू शकतात, असे न्यायालयाने म्हटले. तसेच ‘अॅडेड फॅट’हा निकष जगात कुठेही वापरला जात नसल्याचे निरीक्षण नोंदवले. त्यामुळे ‘एकूण साखर’आणि ‘सॅच्युरेटेड फॅट’यांचा विचार करून, मीठासह या तीन घटकांसाठी इशारा लेबल लागू करण्याचे निर्देश देण्यात आले. एफएसएसएआयने यापूर्वी या निकषांवर सहमती दर्शवली होती, असे न्यायालयाने नमूद केले.
इशारा लेबल लावण्यासाठी प्रस्तावित मर्यादा खूप कमी ठेवल्यास जवळपास सर्व पाकीटबंद खाद्यपदार्थांवर इशारा लागू होईल आणि ग्राहकांना अशा लेबलांची सवय होऊन त्यांचा प्रभाव कमी होईल. याला ‘लेबल फॅटिग’असे म्हटले जाते. एका अभ्यासानुसार प्रस्तावित मर्यादांमुळे ४४,१०९ पाकीटबंद खाद्यपदार्थांपैकी ९४.१ टक्के उत्पादनांवर किमान एक इशारा लागू झाला असता. त्यामुळे पुराव्यांच्या आधारे पोषक घटकांच्या मर्यादा नव्याने निश्चित करून, कालांतराने त्या अधिक कठोर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.
तज्ज्ञ समितीत एकमत न झाल्यानंतर एफएसएसएआयने पॅकेजच्या मागील बाजूस ठळक मजकूर आणि पुढील बाजूस दैनिक सेवन मर्यादा दर्शवण्याचे पर्याय मांडले. मात्र, न्यायालयाने हे पर्याय प्रत्यक्ष फ्रंट-ऑफ-पॅक लेबलिंग नसल्याचे स्पष्ट केले.
एफएसएसएआयने दहा आठवड्यांत प्रगतीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले. अंतिम अधिसूचनेनंतर ३६५ दिवसांनी इशारा लेबल अनिवार्य होईल; मात्र कंपन्यांना त्यापूर्वीही नवीन लेबलिंग स्वीकारता येईल.
भारतीय ग्राहकांचे आरोग्यही महत्त्वाचे
नवी दिल्ली : पाकिटबंद अन्नपदार्थांबाबत बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून अमेरिका किंवा ब्रिटनमधील ग्राहकांना जेवढी माहिती आणि संरक्षण मिळते, तेवढेच संरक्षण भारतीय ग्राहकांनाही मिळणे हा त्यांचा अधिकार आहे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने एफएसएसआयला सुनावले. बहुराष्ट्रीय कंपन्या इतर देशांमध्ये पॅकेजिंगवरील पोषणमूल्यांची माहिती देण्यासंबंधीच्या नियमांचे पालन करतात, काही ठिकाणी स्वेच्छेनेही हे नियम स्वीकारतात; मात्र भारतात अशा उपाययोजनांना विरोध करतात, हे खरे असल्यास ही बाब अत्यंत चिंताजनक आहे, अशा शब्दांत न्या. जे. बी. पार्डीवाला आणि न्या. के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने उद्वेग व्यक्त केला.
माहिती ठळक अक्षरांमध्ये हवी
एफएसएसएआयने यापूर्वी ‘हाय शुगर’, ‘हाय सॅच्युरेटेड फॅट’ आणि ‘हाय सॉल्ट’असा मजकूर असलेले एकच लाल षटकोनी चिन्ह प्रस्तावित केले होते. मात्र, ग्राहकांना पदार्थातील प्रत्येक घटकाचे प्रमाण जास्त असल्याचे सहज समजण्यासाठी स्वतंत्र चिन्हे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. प्रत्येक षटकोनी चिन्ह पॅकेजच्या पुढील भागाच्या किमान ४ ते ५ टक्के जागेत असावे. अक्षरे ठळक, स्पष्ट आणि सहज वाचता येण्यासारखी असावीत.