

नवी दिल्ली : लग्नाआधी मुलगा आणि मुलगी हे ‘पूर्णपणे अपरिचित’ असतात आणि लग्नपूर्व शारीरिक संबंध ठेवताना त्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे, असा महत्वाचा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. बी. व्ही. नागरत्ना आणि न्या. उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर खोट्या विवाहाच्या आश्वासनावर बलात्कार केल्याच्या आरोपातील एका आरोपीच्या जामिनाच्या अर्जावर सुनावणी सुरू होती. यावेळी खंडपीठाने संबंधित महिलेला, ती दुबईपर्यंत का गेली, जिथे दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले, असा प्रश्न केला. ‘हे परस्पर संमतीने झालेले दिसते. कदाचित आम्ही जुन्या विचारांचे असू, पण लग्नाआधी मुलगा आणि मुलगी हे पूर्णपणे अपरिचित असतात. लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवताना त्यांनी फार काळजी घ्यायला हवी’ असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. न्या. नागरत्ना म्हणाल्या, ‘त्यांच्या नात्यातील चढउतार काहीही असोत, लग्नाआधी ते शारीरिक संबंध कसे ठेवू शकतात, हे आम्हाला समजत नाही. कदाचित आम्ही जुन्या विचारांचे असू, पण लग्नाआधी कुणावरही विश्वास ठेवू नये, तुम्ही अत्यंत सावध राहिले पाहिजे.’
मॅट्रिमोनियल वेबसाईटवर झाली होती ओळख, महिलेच्या वकिलांचा दावा
महिलेच्या वकिलांनी सांगितले की, २०२२ मध्ये त्यांची ओळख एका मॅट्रिमोनियल वेबसाईटवर झाली होती. आरोपीने विवाहाचे खोटे आश्वासन देऊन दिल्लीत अनेक वेळा आणि नंतर दुबईत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. न्या. नागरत्ना म्हणाल्या की, महिलेला दुबईला जाण्याची गरज काय होती, असा प्रश्न उपस्थित करत, हे प्रकरण परस्पर संमतीच्या संबंधांचेच दिसते, असे मत व्यक्त केले. ‘लग्नाआधी तिने जायला नको होते. आम्ही या प्रकरणात मध्यस्थीकडे पाठवू. परस्पर संमतीचे संबंध असताना अशी प्रकरणे चालवून दोषसिद्धी करण्याची गरज नसते,’ असे त्या म्हणाल्या. न्या. नागरत्ना यांनी आरोपीच्या वकिलांना महिलेला काही भरपाई देऊन प्रकरण निकाली काढण्याचा सल्ला दिला. तसेच, दोन्ही पक्षांची भूमिका जाणून घेण्यासाठी महिलांच्या वकिलांना तडजोडीची शक्यता तपासण्यास सांगून प्रकरण बुधवारी सुनावणीसाठी ठेवण्यात आले.
महिलेने तक्रारीत म्हटले आहे की आरोपीच्या आग्रहावरून ती दुबईला गेली, जिथे त्याने विवाहाच्या खोट्या कारणावरून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तिच्या संमतीशिवाय आक्षेपार्ह व्हिडिओ चित्रीत केले. तिने विरोध केल्यास ते व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. त्यानंतर तिला समजले की, आरोपीने जानेवारी २०२४ मध्ये पंजाबमध्ये दुसरे लग्न केले आहे, असेही तिने सांगितले.
दिल्ली उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालयाने आरोपीचा जामिनाचा अर्ज फेटाळला होता. उच्च न्यायालयाने नमूद केले की, आरोपांवरून प्रथमदर्शनी विवाहाचे आश्वासन सुरुवातीपासूनच खोटे असल्याचे दिसते. विशेषतः आरोपी आधीच विवाहित असून त्याने १९ जानेवारी २०२४ रोजी पुन्हा विवाह केला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध नाराजी व्यक्त करत आरोपीने या प्रकरणात जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.