

नवी दिल्ली : चीनने भारताचा भूभाग हडपल्याचे तुमच्याकडे पुरावे आहेत का? तुम्हाला कसे कळले की, चीनने भारताचा भूभाग हडप केला आहे? तुम्ही खरे भारतीय असता तर असे वक्तव्य केले नसते, अशा शब्दांत काँग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फटकारले.
९ डिसेंबर २०२२ रोजी भारत व चीनच्या लष्करामध्ये झालेल्या चकमकीनंतर भारतीय लष्कराबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या कथित टिप्पणीवरून सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांची कानउघाडणी केली. राहुल गांधी यांनी हे वक्तव्य 'भारत जोडो यात्रे’च्या काळात केले होते. यावरून त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा करण्यात आला होता. याप्रकरणी आता त्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला असला तरी तीव्र शब्दांत फटकारले.
सर्वोच्च न्यायालयाचे न्या. दीपांकर दत्ता व न्या. ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली. न्यायालयाने सांगितले की, चीनने भारताच्या भूभागावर कब्जा केल्याचे गांधी यांचे वक्तव्य बेफिकीरी दर्शवणारे आहे. सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती असताना विरोधी पक्षनेत्याने असे वक्तव्य करू नये. तुम्हाला कसे कळले की २ हजार चौरस किलोमीटर भारतीय भूभाग चीनने घेतला आहे? तुम्ही तिथे होता का? तुमच्याकडे काही विश्वासार्ह पुरावे आहेत का? कोणतेही पुरावे नसताना तुम्ही ही विधाने का करता? जर तुम्ही खरे भारतीय असाल तर तुम्ही असे काही बोलणार नाही, जेव्हा सीमेवर कोणताही वाद असताना तुम्ही हे कसे म्हणू शकता? तुम्ही संसदेत हा प्रश्न का उपस्थित करत नाही?, अशा प्रश्नांच्या फैरी न्यायालयाने राहुल गांधी यांच्यावर झाडल्या.
तुमच्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण एक भारतीय म्हणून सैन्यावर अशी टिप्पणी करणे योग्य आहे का? तुम्ही एक जबाबदार नेते आहात, असे न्यायालयाने म्हटले आहे.
गांधी यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अभिषेक सिंघवी म्हणाले की, विरोधी पक्षनेते मुद्दे उपस्थित करू शकत नसतील तर ती दुर्दैवी परिस्थिती असेल.
ते प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या या गोष्टी बोलू शकत नसतील तर ते विरोधी पक्षनेते असू शकत नाहीत, असा युक्तिवाद सिंघवी यांनी केला.
राहुल गांधींना संबंधित खटल्यात दिलासा
या खटल्याच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना दिलासा दिला व याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयात सुरू असलेल्या कार्यवाहीवर स्थगिती आणली.