
नवी दिल्ली : एकापेक्षा जास्त घरे आणि अनेक एकर जमीन असलेल्या तरुणाला वडिलांच्या निधनानंतर नोकरी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या जागी अनुकंपा तत्वावर नियुक्ती व्हावी, अशी याचिकाकर्त्याची मागणी होती. अनुकंपा नियुक्तीला अधिकार म्हणून पाहू नये तसेच अशा नियुक्तीसाठी उमेदवारांनी निकष पूर्ण करायला हवेत, असे सर्वोच्च न्यायालयाने आधीच स्पष्ट केले होते.
रवि कुमार जेफ याचे वडील केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात प्रमुख आय़ुक्त होते. २०१५ मध्ये रवि कुमार यांच्या वडिलांचे निधन झाले होते. राजस्थानच्या मुख्य आयुक्त कार्यालयात अनुकंपा तत्वावर नियुक्ती व्हावी अशी मागणी रवि कुमारने केली होती. न्या. उज्ज्वल भुइया आणि न्या.मनमोहन यांनी रवि कुमार यांची याचिका फेटाळून लावली.
नियुक्तीला विरोध
रवि कुमारच्या वडिलांची दोन घरे आहेत. याशिवाय ३३ एकर जमीन आणि ८५ हजार रुपये इतके निवृत्ती वेतन मिळते. राजस्थान उच्च न्यायालय आणि केंद्रीय प्रशासकीय लवादाकडून रवि कुमार यांच्या अनुकंपा नियुक्तीला विरोध करण्यात आला होता. विभागाने घेतलेल्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने कायम राखले. कुटुंबाकडे सोयीसुविधांसह उदरनिर्वाहासाठी पुरेसे उत्पन्न आणि साधने असल्याचे विभागाचे म्हणणे योग्य आहे असे सुप्रीम कोर्टाने म्हटले.
विभागीय समितीने अनुकंपा नियुक्तीसाठी १९ अर्जदारांच्या नावावर विचार केला होता. त्यात फक्त ३ नावे पात्र ठरली.