व्हीव्हीपीएटी व ईव्हीएम पडताळणीस नकार; मतपत्रिकेद्वारे मतदानाची मागणीही SC ने फेटाळली; पण दिले 'हे' दोन निर्देश

कोणत्याही यंत्रणेवर अंधपणे अविश्वास दर्शविल्यास त्यामधून संशयाचे वातावरण निर्माण होते, असे स्पष्ट करून सर्वोच्च न्यायालयाने...
व्हीव्हीपीएटी व ईव्हीएम पडताळणीस नकार; मतपत्रिकेद्वारे मतदानाची मागणीही SC ने फेटाळली; पण दिले 'हे' दोन निर्देश

नवी दिल्ली : कोणत्याही यंत्रणेवर अंधपणे अविश्वास दर्शविल्यास त्यामधून संशयाचे वातावरण निर्माण होते, असे स्पष्ट करून सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे (ईव्हीएम) करण्यात आलेल्या मतदानाची ‘व्हीव्हीपीएटी’ मशीनच्या पावत्यांची पूर्णपणे पडताळणी करावी, अशी मागणी करणाऱ्या सर्व याचिका फेटाळून लावल्या. त्याचबरोबर मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी करणाऱ्या याचिकाही न्यायालयाने फेटाळल्या आहेत.

सर्व यंत्रणांमध्ये विश्वास आणि सौहार्दता अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणे हाच लोकशाहीचा अर्थ आहे, असे न्या. संजीव खन्ना आणि न्या. दीपांकर दत्त यांच्या पीठाने म्हटले आहे. तसेच न्या. खन्ना आणि न्या. दत्त यांच्या पीठाने ‘ईव्हीएम’बाबत सहमतीने दोन निर्देश दिले असून, याबाबतच्या सर्व याचिका आणि मतपत्रिकेद्वारे मतदानाची मागणी करणाऱ्या अन्य याचिका फेटाळून लावल्या आहेत.

न्यायालयाचे दोन निर्देश

सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने दोन निर्देश दिले आहेत. ईव्हीएममध्ये निवडणूक चिन्ह लोड केल्यानंतर ती यंत्रे ४५ दिवस सुरक्षित ठेवण्यात यावी. तसेच निवडणूक निकालानंतर जो उमेदवार दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर असेल त्याने विनंती केल्यास ईव्हीएम उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या अभियंत्यांना यंत्राच्या मायक्रोकंट्रोलरची पडताळणी करण्याची अनुमती देण्यात आली आहे.

मायक्रोकंट्रोलरची पडताळणी करण्याची विनंती निकाल लागल्यापासून सात दिवसांमध्ये करावयाची आहे आणि त्यासाठी उमेदवाराला शुल्क भरावे लागणार आहे. पडताळणीच्या वेळी ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचे स्पष्ट झाले तर उमेदवाराला शुल्क परत केले जाणार आहे, असे पीठाने म्हटले आहे. एका ईव्हीएममध्ये बॅलट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपीएटी अशी तीन युनिट आहेत.

केवळ ईव्हीएमच्या कार्यक्षमतेबद्दल संशय व्यक्त केला म्हणून आम्ही निवडणुकांवर नियंत्रण ठेवू शकत नाही अथवा आदेश देऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने गेल्या सुनावणीच्या वेळी म्हटले होते.

ही विरोधकांना सणसणीत चपराक - पंतप्रधान

ईव्हीएमबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय ही काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांना बसलेली सणसणीत चपराक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ईव्हीएमबाबत अविश्वासाचे वातावरण निर्माण करण्याचे पाप केल्याबद्दल विरोधकांनी माफी मागावी, असेही मोदी यांनी म्हटले आहे.

काँग्रेस व्हीव्हीपीएटीबाबत प्रचार सुरूच ठेवणार - जयराम रमेश

नवी दिल्ली : निवडणूक प्रक्रियेबद्दल जनतेच्या मनात विश्वास निर्माण व्हावा यासाठी काँग्रेस व्हीव्हीपीएटीबद्दलचा आपला राजकीय प्रचार सुरूच ठेवणार असल्याचे पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी व्हीव्हीपीएटीबाबतच्या याचिका फेटाळल्या, त्यामध्ये काँग्रेस पक्ष प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पक्षकार नव्हता, आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय पीठाच्या निर्णयाची नोंद घेतली आहे, असेही रमेश म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in