मथुरेतील शाही ईदगाह मशिदीच्या सर्वेक्षणास सुप्रीम कोर्टाचा नकार

‘श्री कृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्ट’च्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला.
मथुरेतील शाही ईदगाह मशिदीच्या सर्वेक्षणास सुप्रीम कोर्टाचा नकार

नवी दिल्ली : मथुरा येथील जन्मभूमी-शाही इदगाह मशीद परिसर पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या हिंदू मंदिरांवर बांधला गेला आहे की नाही, हे ठरवण्यासाठी त्याचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची मागणी करणाऱ्या ‘श्री कृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्ट’च्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला.

न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या १० जुलैच्या निर्णयाला आव्हान देणारे अपील फेटाळून लावले. श्री कृष्ण जन्मभूमी ट्रस्टने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले होते. खंडपीठाने म्हटले आहे की, ट्रायल कोर्टाला आदेश देण्याचे अधिकार आहेत. कलम १३६ अंतर्गत आमच्या अधिकार क्षेत्राचा वापर करण्यासाठी, इतर याचिकांमधील पक्षांच्या अधिकार आणि वादांबद्दल कोणताही पूर्वग्रह नाही.’’

या वर्षाच्या सुरुवातीला, उत्तर प्रदेशातील एका ट्रायल कोर्टाने आणि अलाहाबाद हायकोर्टाने सर्वेक्षणासाठी हिंदू ट्रस्टची याचिका फेटाळली होती. त्यामुळे ट्रस्टने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. हिंदू चिन्हे, मंदिराचे खांब आणि मंदिरातील इतर महत्त्वाच्या घटकांचे सतत खोदकाम आणि अन्य कारणांनी नाश होत आहे आणि यामुळे त्या जागेचे पावित्र्य आणि सांस्कृतिक वारशावर गदा आली आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. ज्येष्ठ वकील आणि भाजपचे नेते गौरव भाटिया यांनी ट्रस्टतर्फे बाजू मांडली. शाही मशीद ईदगाह व्यवस्थापन समितीतर्फे अधिवक्ता तस्नीम अहमदी यांनी बाजू मांडली.

logo
marathi.freepressjournal.in