
नवी दिल्ली : साल २००२ च्या गोध्रा हत्याकांड संबंधित प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी येत्या १९ जुलै रोजी आहे. तोपर्यंत तिस्ता सेटलवाड यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्याचा आदेश बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. बी. आर. गवर्इ, ए. एस. बोपान्ना आणि दीपांकर दत्त यांच्या खंडपीठाने गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात गुजरात सरकारला नोटीस बजावली. सेटलवाड यांनी त्या संबंधित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. यापूर्वी १ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने सेटलवाड यांना एक आठवडाभर अटकेपासून संरक्षण दिले होते. गोध्रा हत्याकांडात निष्पाप निर्दोष लोकांना दंगलीच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी खोटे पुरावे रचल्याप्रकरणी सेटलवाड यांच्यावर खटला सुरू आहे.