

नवी दिल्ली : न्यायाधीश निवृत्तीच्या आदल्या दिवशी निकाल देण्याचा धडाकाच लावत आहेत, असे म्हणत सरन्यायधीश सूर्य कांत यांनी न्यायालयातील भ्रष्ट कारभारावर अप्रत्यक्षपणे ताशेरे ओढले आहेत.
मध्य प्रदेशमधील प्रिंसिपल डिस्ट्रिक्ट जज यांनी त्यांच्या निवृत्तीच्या आधी १० दिवस झालेल्या निलंबनाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. त्यांचे हे निलंबन हे त्यांनी दिलेल्या दोन आदेशांवरून करण्यात आले होते. या याचिकेच्या सुनावणीवेळी न्या. सूर्य कांत आणि न्या. जॉयमाला बागची या दोन सदस्यीय पीठाने, 'जज हे त्यांच्या निवृत्तीपूर्वी षटकार मारत आहेत, हा एक दुर्दैवी ट्रेंड असून याबाबत मला जास्त खोलात जायचे नाही’, असे म्हटले आहे.
यावर दोन सदस्यीय पीठाने, 'जजविरूद्ध चुकीची ऑर्डर पास केली म्हणून शिस्तभंगाची कारवाई करता येत नाही. मात्र, त्यांचे निलंबन यासाठी झालेले नाही. त्यांनी हे आदेश देताना अप्रामाणिकपणा दाखवला याबद्दल त्यांचे निलंबन झाले आहे.' असे स्पष्ट केले.
दरम्यान, तुम्ही निलंबनाच्या निर्णयाविरूद्ध उच्च न्यायालयात का दाद मागितली नाही, अशीही विचारणा पीठाने केली. त्यावर पूर्णपीठाने निर्णय दिल्यानंतर त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागणेच उचित ठरेल, असे याचिकाकर्त्याला वाटल्याचे वकील संघी यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने आरटीआयच्या माध्यमातून माहिती मिळवण्यावरही वक्तव्य केले. त्यानंतर या दोन सदस्यीय बेंचने याचिकाकर्त्याला उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले.
कारवाई शिस्तभंगाची नाही, तर...
याचिका करणाऱ्या जजच्या वतीने वरिष्ठ वकील विपीन संघी यांनी युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी या जजची कारकीर्द ही प्रभावी असून त्यांचे वार्षिक गुप्त अहवालातील रेटिंगही चांगले आहेत. ते ३० नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार होते. मात्र १९ नोव्हेंबर रोजी त्यांनी दिलेल्या दोन आदेशांवरून त्यांना निलंबित करण्यात आले. एखाद्या जजला दोन आदेश दिले महणून कसे काय निलंबित केले जाऊ शकते, असा सवाल विपीन संघी यांनी न्यायालयात उपस्थित केला.