पत्नी ही मोलकरीण नाही, तर अर्धांगिनी; घरकामात पतीचाही समान सहभाग हवा! सुप्रीम कोर्टाने टोचले 'नवरोबां'चे कान

घरकाम करण्यास टाळाटाळ करणाऱ्या 'नवरोबां'चे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी चांगलेच कान टोचले. स्वयंपाक, साफसफाई आणि कपडे धुण्यासारख्या घरगुती कामांमध्ये पतीने पत्नीइतकाच सहभाग घेतला पाहिजे, कारण त्याने एका मोलकरणीशी नाही तर अर्धांगिनीशी विवाह केला आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले.
पत्नी ही मोलकरीण नाही, तर अर्धांगिनी; घरकामात पतीचाही समान सहभाग हवा! सुप्रीम कोर्टाने टोचले 'नवरोबां'चे कान
पत्नी ही मोलकरीण नाही, तर अर्धांगिनी; घरकामात पतीचाही समान सहभाग हवा! सुप्रीम कोर्टाने टोचले 'नवरोबां'चे कान'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

नवी दिल्ली : घरकाम करण्यास टाळाटाळ करणाऱ्या 'नवरोबां'चे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी चांगलेच कान टोचले. स्वयंपाक, साफसफाई आणि कपडे धुण्यासारख्या घरगुती कामांमध्ये पतीने पत्नीइतकाच सहभाग घेतला पाहिजे, कारण त्याने एका मोलकरणीशी नाही तर अर्धांगिनीशी विवाह केला आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले.

एका व्यक्तीने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती, त्यावर सुनावणी करताना न्या. विक्रम नाथ आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठाने हे महत्त्वपूर्ण भाष्य केले.

पुढील सुनावणी २७एप्रिलला

न्यायमूर्ती मेहता म्हणाले की, तुम्ही एखाद्या मोलकरणीशी नाही, तर एका जीवनसाथीशी लग्न करत आहात, हे लक्षात ठेवा. विशेष म्हणजे, पती-पत्नी दोघेही सरकारी शाळेत कार्यरत आहेत. या प्रकरणातील मध्यस्थी अपयशी ठरल्याचे सांगण्यात आले आहे. न्यायालयाने आता दोन्ही पक्षांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेश दिले असून, न्यायालय स्वतः त्यांच्याशी संवाद साधणार आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ एप्रिल रोजी होणार आहे.

प्रकरण काय?

संबंधित जोडप्याचा विवाह मे २०१७ मध्ये झाला होता, मात्र २०१९ पासून ते वेगळे राहत आहेत. पतीने 'क्रूरतेच्या' कारणावरून घटस्फोटासाठी अर्ज केला होता. कनिष्ठ न्यायालयाने पतीच्या बाजूने निकाल देत घटस्फोट मंजूर केला होता, मात्र कर्नाटक उच्च न्यायालयाने हा आदेश रद्द ठरवला. त्याविरोधात पतीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायालयातील युक्तिवाद

सुनावणीदरम्यान पतीच्या वकिलांनी असा दावा केला की, पत्नीची वागणूक अयोग्य आहे आणि ती घरात स्वयंपाक करत नाही, ही एक प्रकारची क्रूरता आहे. यावर खंडपीठाने कडक शब्दांत सुनावताना स्पष्ट केले की, तुम्हाला स्वयंपाक, स्वच्छता आणि कपडे धुणे या सर्व कामांत समान सहभाग घ्यावा लागेल. आजची परिस्थिती बदलली आहे. उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य आहे, पत्नीने स्वयंपाक न करणे हे क्रूरतेचे लक्षण असू शकत नाही.

logo
marathi.freepressjournal.in