फटाक्यांवर पूर्ण बंदी नाही, पण २४ तास फोडण्याचीही मुभा नाही; सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट पवित्रा

फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्यामुळे लोकांच्या भावना दुखावतील, न्यायालयातर्फे फटाक्यांवर कोणतीही संपूर्ण बंदी घातली जाणार नाही, तसेच दिवसभर (२४ तास) फटाके फोडण्याची परवानगीही दिली जाणार नाही.
फटाक्यांवर पूर्ण बंदी नाही, पण २४ तास फोडण्याचीही मुभा नाही; सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट पवित्रा
फटाक्यांवर पूर्ण बंदी नाही, पण २४ तास फोडण्याचीही मुभा नाही; सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट पवित्रासंग्रहित छायाचित्र
Published on: 

नवी दिल्ली : फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्यामुळे लोकांच्या भावना दुखावतील, न्यायालयातर्फे फटाक्यांवर कोणतीही संपूर्ण बंदी घातली जाणार नाही, तसेच दिवसभर (२४ तास) फटाके फोडण्याची परवानगीही दिली जाणार नाही. फटाके फोडण्यासाठी विशिष्ट वेळा ठरवून देऊन एक सुवर्णमध्य काढला जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले.

न्या. एम. एम. सुंदरेश आणि न्या. पी. बी. वराळे यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान सांगितले की, आम्ही हे अत्यंत स्पष्ट करू इच्छितो की, आम्ही ना पूर्ण बंदीच्या बाजूने आहोत, ना संपूर्ण दिवसभर फटाके फोडण्याच्या परवानगीच्या बाजूने. पूर्ण बंदीमुळे लोकांच्या भावनांवर परिणाम होईल, तसेच दिवसभर फटाके फोडल्यास वृद्ध, रुग्ण आणि लहान मुलांसह सर्वांवरच त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे विशिष्ट वेळ ठरवून देऊन आपल्याला मार्ग काढवा लागेल.

हिरवे फटाके

सुनावणीदरम्यान अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी न्यायालयासमोर एक टिपण सादर केले. सीएसआयआर-नीरीच्या शिफारशीनुसार, ठरावीक अटींवर आणि मर्यादित स्वरूपात 'नेक्स्ट-जेनेरेशन जॉइन्ट ग्रीन क्रॅकर्स'च्या वापराला शिथिलता देण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे यात नमूद करण्यात आले आहे.

सीएसआयआर-नीरी आणि इतर संस्थांच्या सहकार्याने विकसित केलेले हे नवीन 'ग्रीन फटाके' उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि बेरियम साल्टचे प्रमाण घटवण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. परवानाधारक उत्पादकांकडूनच हे फटाके तयार केले जावेत, निर्धारित ध्वनी मर्यादांचे (१२५ डीबी) पालन व्हावे आणि त्यात प्रतिबंधित रसायने नसावीत, तरच त्यांना परवानगी देता येईल, असे या टिपणात म्हटले आहे.

बेरियम वापर

'बेरियम'च्या वापराचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने आगामी १५ ऑक्टोबर रोजी सुनावणीसाठी राखला आहे. गेल्या वर्षीही दिवाळीच्या तोंडावर न्यायालयाने दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर) पर्यावरण आणि आरोग्याची काळजी घेत, विशिष्ट अटींच्या अधीन राहून 'ग्रीन फटाके' विक्री आणि वापरास परवानगी दिली होती. दिवाळीपूर्वी आणि दिवाळीच्या दिवशी ठराविक वेळेतच ग्रीन फटाके फोडता येतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in