परीक्षेचे पावित्र्य भंग झाले, या ठोस आधारावरच फेरपरीक्षेचा आदेश शक्य; सर्वोच्च न्यायालयाने केले स्पष्ट

परीक्षेचे पावित्र्य भंग झाले, या ठोस आधारावरच फेरपरीक्षेचा आदेश शक्य; सर्वोच्च न्यायालयाने केले स्पष्ट

‘नीट-यूजी’च्या संपूर्ण परीक्षेचे पावित्र्य भंग झाले आहे, या ठोस आधारावरच फेरपरीक्षेचा आदेश देता येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले.
Published on

नवी दिल्ली : ‘नीट-यूजी’च्या संपूर्ण परीक्षेचे पावित्र्य भंग झाले आहे, या ठोस आधारावरच फेरपरीक्षेचा आदेश देता येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले. वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट-यूजी’संदर्भात करण्यात आलेल्या अनेक याचिकांवरील सुनावणीला गुरुवारी सुरुवात झाली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या पीठाने याचे सामाजिक परिणाम होणार असल्याचे म्हटले आहे.

परीक्षा रद्द करा, फेरपरीक्षा घ्या, न्यायालयाच्या देखरेखीखाली अनियमिततेची चौकशी करा, अशी मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्यांना सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की, पेपरफुटी पद्धतशीरपणे घडवून आणण्यात आली आणि त्यामुळे संपूर्ण परीक्षेचे पावित्र्य भंग झाले आहे हे दर्शवून द्या. हजारो विद्यार्थ्यांचे लक्ष निकालाकडे आहे. त्यामुळे सर्व बाजूंचे म्हणणे ऐकून निर्णय घेऊ. संपूर्ण परीक्षेचे पावित्र्य भंग झाले आहे, या ठोस आधारावरच फेरपरीक्षेचे आदेश देता येतील, असे सरन्यायाधीशांनी सांगितले.

या प्रकरणाचा सीबीआयकडून तपास केला जात आहे, सीबीआयने आम्हाला जे सांगितले आहे, ते उघड झाले तर त्याचा तपासावर परिणाम होईल आणि लोक अधिक सूज्ञ होतील. ‘एनटीए’च्या याचिकेसह याप्रकरणी ४० हून अधिक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी विविध न्यायालयांमध्ये जी प्रकरणे प्रलंबित आहेत ती सर्वोच्च न्यायालयाकडे वर्ग करण्याची मागणी करण्यात आली आहे.

केंद्रनिहाय, शहरनिहाय निकाल जाहीर करा

सर्वोच्च न्यायालयाने ‘एनटीए’ला ‘नीट-यूजी’चे केंद्रनिहाय आणि शहरनिहाय निकाल २० जुलै रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत सादर करण्यास सांगितले आहे. उमेदवारांची ओळख जाहीर होऊ नये याची खबरदारी घेण्यासही पीठाने सांगितले आहे. या प्रकरणाशी संबंधित याचिकेवरील सुनावणी २२ जुलै रोजी सुरू होणार आहे. पाटणा आणि हजारीबाग येथेच पेपरफुटी झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचेही पीठाने म्हटले आहे.

एम्स, पाटणामधील चार विद्यार्थ्यांना अटक

नीट-यूजी पेपरफुटीप्रकरणी सीबीआयने गुरुवारी एम्स, पाटणा येथील चार विद्यार्थ्यांची चौकशी करून त्यांना अटक केली. एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाचे तीन विद्यार्थी आणि दुसऱ्या वर्षाच्या एका विद्यार्थ्याला सीबीआयने चौकशीसाठी कार्यालयात नेले होते. या विद्यार्थ्याना ज्येष्ठांच्या उपस्थितीत त्यांच्या वसतिगृहातून नेण्यात आले. चौकशीसाठी या विद्यार्थ्यांना घेऊन जाणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सीबीआयने या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाला टाळे ठोकले आहे.

चंदनसिंह, राहुल अनंत आणि कुमार शानू हे तिसऱ्या वर्षाचे विद्यार्थी आहेत, तर करण जैन हा दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. या विद्यार्थ्यांचे छायाचित्र आणि भ्रमणध्वनी क्रमांक ज्येष्ठ अधिकाऱ्याने पाठविले होते, असे एम्स पाटणाचे संचालक जी. के. पॉल यांनी सांगितले. ‘एनटीए’च्या पेटीतून ‘नीट-यूजी’चे पेपर चोरणाऱ्या पंकजकुमार याला अटक करण्यात आल्यानंतर गुरुवारी या चार विद्यार्थ्यांना सीबीआय चौकशीसाठी घेऊन गेले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in