
नवी दिल्ली : दिल्लीत एका ६ वर्षीय मुलीचा ‘रेबीज’मुळे झालेल्या दुर्दैवी मृत्यूनंतर, देशभरात गंभीर बनलेल्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येची आणि त्यांच्या हल्ल्यांच्या वाढत्या घटनांची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. ही परिस्थिती 'अत्यंत चिंताजनक आणि अस्वस्थ करणारी' असल्याचे नमूद करत, न्यायालयाने याप्रकरणी सुनावणी सुरू केली असून, या समस्येवर देशव्यापी तोडगा काढण्याचे संकेत दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या या हस्तक्षेपामागे दिल्लीतील एका हृदयद्रावक घटनेचे वृत्त कारणीभूत ठरले. न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने एका इंग्रजी दैनिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेतली.
दिल्लीच्या पूठ कलान परिसरात राहणाऱ्या ६ वर्षीय छवी शर्मा हिला ३० जून रोजी एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले, मात्र उपचारांनंतरही ‘रेबीज’चा संसर्ग तिच्या शरीरात पसरला आणि २६ जुलै रोजी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेने वेळेवर आणि योग्य उपचारांचा अभाव तसेच भटक्या कुत्र्यांच्या समस्येचे भीषण परिणाम अधोरेखित केले.
आपल्या आदेशात न्यायालयाने म्हटले आहे की, शहरावर भटक्या कुत्र्यांचे संकट आणि त्याची किंमत मोजणारी मुले या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेले हे वृत्त अत्यंत त्रासदायक आहे. शहरी आणि निमशहरी भागांतून कुत्र्यांच्या चावण्याच्या शेकडो घटना समोर येत आहेत, ज्यामुळे अनेकदा रेबीजचा संसर्ग होतो. दुर्दैवाने, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक या जीवघेण्या आजाराला बळी पडत आहेत. न्या. पारडीवाला यांनी या प्रकरणाची स्वतःहून दखल घेत असल्याचे स्पष्ट केले आणि या प्रकरणाला 'स्वतःहून दाखल केलेली रिट याचिका' म्हणून हाताळण्याचे निर्देश न्यायालयाच्या नोंदणी विभागाला दिले. पुढील निर्देशांसाठी हे प्रकरण सरन्यायाधीश भूषण आर. गवई यांच्यासमोर ठेवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे १५ जुलै रोजी, दुसऱ्या एका खंडपीठाने भटक्या कुत्र्यांना खाद्य पुरवण्याच्या मुद्द्यावर आणि सार्वजनिक सुरक्षेवर चिंता व्यक्त केली होती. देशात विविध ठिकाणी भटक्या श्वानांचा त्रास वाढत चालला आहे.