
नवी दिल्ली : दिल्लीच्या रस्त्यांवरून भटक्या कुत्र्यांना हटवण्याबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यावर देशभरातून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात सरन्यायाधीश बी. आर गवई यांनी लक्ष घालण्याची हमी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ११ ऑगस्ट रोजी सर्व भटक्या कुत्र्यांना हटवण्याच्या दिलेल्या आदेशावर आक्षेप घेत एका वकिलाने हे प्रकरण सरन्यायाधीशांसमोर मांडले होते.
सदर बाब भटक्या कुत्र्यांशी संबंधित आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आहे ज्यामध्ये असे स्पष्टपणे सांगितले आहे की, कुत्र्यांना अशा प्रकारे हलवता येणार नाही. त्या निर्णयात न्या. करोल हेही सहभागी होते. त्या निर्णयात सर्व जीवांसाठी करुणा असली पाहिजे, असेही नमूद आहे, असे या वकिलाने म्हटले आहे.
यावर सरन्यायाधीश गवई म्हणाले, पण याप्रकरणी दुसऱ्या खंडपीठाने आधीच आदेश दिले आहेत. मी यामध्ये लक्ष घालेन. न्या. जे.बी. पारडीवाला आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने ११ ऑगस्ट रोजी दिल्ली सरकार, दिल्ली महानगरपालिका आणि नवी दिल्ली महानगरपालिका यांना दिल्लीच्या सर्व परिसरांमधून भटक्या कुत्र्यांना हटवून त्यांना प्राण्यांच्या आश्रयस्थानात हलवण्याचे आदेश दिले होते.