पैसे भरा, अन्यथा तुरुंगात टाकणार स्पाईसजेटच्या अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाचा इशारा

सुप्रीम कोर्टाने अजय सिंह यांच्याविरोधात अवमान नोटीस जारी केली होती
पैसे भरा, अन्यथा तुरुंगात टाकणार स्पाईसजेटच्या अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाचा इशारा

नवी दिल्ली : क्रेडिट सुसे खटलाप्रकरणी स्पाईसजेटचे अध्यक्ष अजय सिंह यांना सुप्रीम कोर्टाने सोमवारी २२ सप्टेंबरपर्यंत १२.४५ कोटी रुपये जमा करायला सांगितले आहे. ही रक्कम न दिल्यास अजय सिंह यांना तुरुंगात टाकण्यात येईल, असा इशारा सुप्रीम कोर्टाने दिला.

न्या. विक्रम नाथ व अहसानुद्दीन अमानुल्लाह यांच्या खंडपीठाने २०१५ च्या क्रेडिट सुसे प्रकरणाची सुनावणी केली. न्यायाधीशांनी सांगितले की, हा खटला दीर्घकाळ चालला आहे. आता आम्हाला कठोर कारवाई करावी लागेल. स्पाईसजेट तात्पुरती किंवा कायमस्वरूपी बंद पडली तरीही आम्हाला काहीच फरक पडत नाही. मात्र, कंपनीचे अध्यक्ष अजयसिंह यांना नियमांचे पालन करावेच लागेल.

या प्रकरणी १४ ऑगस्टला सुप्रीम कोर्टाने अजय सिंह यांच्याविरोधात अवमान नोटीस जारी केली होती. अजय सिंह यांनी जाणूनबुजून नियम मानले नाहीत. तसेच १९९.२५ कोटी रुपये आदेश देऊनही दिले नाहीत.

स्वित्झर्लंड येथील एसआरटी टेक्निक्सने स्पाईसजेटसोबत २०११ मध्ये इंजिनच्या देखभालीसाठी १० वर्षांचा करार केला होता. २०१३ मध्ये क्रेडिट सुसेने स्पाईसजेटवर वेळेवर पैसे न दिल्याचा आरोप करून गुन्हा दाखल केला होता.

मद्रास हायकोर्टने स्पाईसजेटला २०२१ पर्यंत बंद करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाविरोधात कंपनीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने दोन्ही पक्षकारांना आपापसात सहमतीने तोडगा काढायला सांगितले होते. मे २०२२ मध्ये क्रेडिट सुसे व विमान कंपनीत करार झाला होता. त्यात स्पाईसजेटला आगाऊ पैसे, शिल्लक पैसे म्हणून १९९ कोटी रुपये क्रेडिट सुसेला देण्याचे ठरले होते.

logo
marathi.freepressjournal.in