

नवी दिल्ली : महिलांवरील अत्याचार करणाऱ्या समाजकंटक आणि गुन्हेगारांच्या मनात कायद्याची आणि पोलिसांची भीती निर्माण करण्याची गरज आहे. दिल्ली-एनसीआर परिसरातील महिला सुरक्षित नसल्याची भावना निर्माण झाली असून, काही ठरावीक भाग तर अतिशय असुरक्षित बनल्याचे सर्वोच्च न्यायालयाने महिलांवरील गुन्ह्यांबाबत चिंता व्यक्त करताना म्हटले आहे.
दिल्ली-एनसीआरमधील अलीकडील बलात्काराच्या घटनांच्या संदर्भातील एका स्वतःहून दाखल करून घेतलेल्या (सुमोटो) जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने हे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले.
प्रत्येक महिलेला सुरक्षित वाटले पाहिजे
खंडपीठाने सुनावणीदरम्यान स्पष्ट केले, आपल्याला एकत्र येऊन काम करावे लागेल. रात्री ११ वाजताही रस्त्यावरून किंवा मेट्रोने प्रवास करताना दिल्ली-एनसीआरमधील प्रत्येक महिलेला सुरक्षित वाटले पाहिजे, याची खात्री आपण केलीच पाहिजे.