भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे अधिकृत युट्यूब चॅनल शुक्रवारी हॅक झाले आहे. या चॅनलचा वापर सामान्यतः खटल्यांच्या सुनावणीसाठी आणि सार्वजनिक हिताच्या बाबींच्या थेट प्रक्षेपणासाठी होतो. मात्र हॅक झाल्यामुळे आता या चॅनलवर यूएस आधारित Ripple Labs ने डेव्हलप केलेल्या XRP या क्रिप्टोकरन्सीचा प्रचार करणारे व्हिडिओ दिसत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या YouTube चॅनेलवर अपलोड केलेल्या अखेरच्या सुनावणींचे व्हिडिओ हॅकर्सनी 'प्रायव्हेट'मध्ये बदलल्याचे समोर आले आहे. त्याजागी XRP या क्रिप्टोकरन्सीचा प्रचार करणारा व्हिडिओ (Brad Garlinghouse: Ripple Responds To The SEC's $2 Billion Fine! XRP PRICE PREDICTION) शुक्रवारी दिसल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ब्रॅड गार्लिंगहाऊस हे रिपल लॅब्सचे सीईओ आहेत, ही कंपनी यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन (SEC) सोबत कायदेशीर विवादात आहे.
'एनआयसी'कडे मदत मागितली-
सर्वोच्च न्यायालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'इंडियन एक्स्प्रेस'ला सांगितले की, नेमके काय झाले याचा तपशील नसला तरी, वेबसाइटसोबत छेडछाड झाल्याचे दिसते. शुक्रवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलबाबतची ही समस्या उघडकीस आली. सर्वोच्च न्यायालयाच्या आयटी टीमने याबाबत एनआयसी (नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर) कडे मदत मागितली आहे, असेही त्यांनी सांगितले.
अलीकडेच, कोलकात्यामधील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या यूट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपित करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाच्या यूट्यूब चॅनलवर दोन लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत.