सुरत डायमंड बोर्स संकटात? महिन्याभरातच हिरे व्यापाऱ्यांचा गुजरातचा मोह भंगला, व्यवसाय पुन्हा मुंबईकडे!

मुंबईचे महत्त्व कमी करत मोठा गाजावाजा करत सुरू झालेले गुजरात येथील सुरत डायमंड बोर्स संकटात सापडल्याचे दिसत आहे.
सुरत डायमंड बोर्स संकटात? महिन्याभरातच हिरे व्यापाऱ्यांचा गुजरातचा मोह भंगला, व्यवसाय पुन्हा मुंबईकडे!

मुंबई : मुंबईचे महत्त्व कमी करत मोठा गाजावाजा करत सुरू झालेले गुजरात येथील सुरत डायमंड बोर्स संकटात सापडल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षी १७ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गुजरातमध्ये सुरत डायमंड बोर्सचे (एसडीबी) उद्घाटन करण्यात आले होते, परंतु एक महिन्यातच त्यांचा हिरमोड झाला असून त्यांनी आपला व्यवसाय पुन्हा मुंबईकडे परतत आहे.

डायमंड बोर्स सर्वात जगातील मोठी कार्यालयीन इमारत आहे. येथे ४,२०० हून अधिक हिरे व्यापार कार्यालये आहेत. मात्र, बोर्ससाठी पुढाकार घेणारे प्रसिद्ध हिरे व्यापारी वल्लभभाई लखानी सुद्धा आपला व्यवसाय पुन्हा मुंबईला हलवणार असल्याचे उघड झाले आहे.

सुरत डायमंड बोर्स सुरू होण्यापूर्वी देशाची आर्थिक राजधानी मुंबई हिरे व्यापाराचे केंद्र मानले जात होते. परंतु एसडीबी सुरू झाल्यानंतर सुरत देखील दागिने आणि हिरे व्यापाराचे एक मोठे केंद्र बनेल असे वाटते होते, मात्र आता या डायमंड बोर्सला मोठा धक्का बसताना दिसत आहे. सुरत शहर आणि बोर्स यांच्यामधील अंतर व्यापाऱ्यांना सोयीचे नसून या ठिकाणी सार्वजनिक वाहतुकीचाही अभाव आहे. याशिवाय कर्मचारी स्थलांतर करण्यास तयार नसल्यामुळेही हिरे व्यापारी पुन्हा मुंबईकडे वळत आहेत.

किरण जेम्सचे सर्वेसर्वा वल्लभभाई लखानी यांचा सुरत डायमंड बोर्स उभे करण्यात मोठा वाटा आहे. मात्र, मुंबईतील इतर व्यापाऱ्यांकडून सहकार्य लाभत नसल्यामुळे लखानी आपला व्यवसाय पुन्हा मुंबईला हलवण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. मुंबईतील हिरे व्यापारी आपला व्यवसाय सूरतला हलवण्यास तयार नसून हा बोर्स सुरतमधील हिरे केंद्रपासून दूर असल्याने कर्मचारी आणि मजूर देखील काम करण्यास तयार नसल्याचे देखील यामागील एक कारण सांगितले जात आहे.

किरण जेम्स मुंबईतून देखील व्यवसाय सुरूच ठेवेल असे सांगितले जात होते. तर दोन दिवसांपासून सुरतहून व्यवसाय पुन्हा मुंबईला हलवण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. सुरत डायमंड बोर्समधील किरण जेम्स सर्वात मोठी कंपनी असून गेल्या महिन्यात व्यवसाय सुरतमध्ये हलवल्यापासून कंपनीच्या व्यवसायावर परिणाम झाला असून कंपनीच्या उत्पन्नात घट झाली असल्याचे सांगण्यात येते.

logo
marathi.freepressjournal.in