नवी दिल्ली : पंजाबच्या पतियाळा येथून चार वेळा खासदार राहिलेल्या आणि माजी केंद्रीय मंत्री असलेल्या लोकसभा खासदार आणि काँग्रेसच्या निलंबित नेत्या परनीत कौर यांनी गुरुवारी येथे भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची आणि त्यांच्या सरकारने गेल्या दहा वर्षांमध्ये केलेल्या कामाची प्रशंसा केली.
कौर यांना त्यांचे पती व पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये पक्षविरोधी कारवायांसाठी काँग्रेसने निलंबित केले होते.
काँग्रेसच्या पंजाब युनिटचे अध्यक्ष अमरिंदरसिंग राजा वारिंग यांनी पक्षाच्या हायकमांडकडे तक्रार पाठवली होती आणि कौर यांनी भाजपला मदत करण्यासाठी पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतल्याचा आरोप केला होता. येथील पक्ष मुख्यालयात भाजप नेत्यांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना कौर यांनी पक्षात प्रवेश केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. पक्षासोबत काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदी, भाजपचे प्रमुख जे. पी. नड्डा आणि संपूर्ण भाजप कुटुंबाचे आभार मानले.
मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक करताना कौर म्हणाल्या की, त्यांनी गेल्या दहा वर्षांत त्यांची धोरणे आणि त्यांच्या सरकारने केलेले काम पाहून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मला पूर्ण विश्वास आहे की, आमच्या मुलांचे भविष्य आणि आपला देश त्यांच्या नेतृत्वाखाली आणि धोरणांमध्ये सुरक्षित राहील, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कौर यांनी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग, विनोद तावडे, तरुण चुग आणि राज्यसभा सदस्य असलेले मुख्य प्रवक्ते अनिल बलूनी यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे पंजाबचे प्रभारी आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि भाजपच्या पंजाब युनिटचे प्रमुख सुनील जाखड हेही उपस्थित होते.
कौर यांचे भाजपमध्ये स्वागत करताना तावडे म्हणाले की, आतापर्यंत विविध पदांवर केलेल्या कामातून त्यांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्यांच्या प्रवेशामुळे पंजाबमध्ये भाजपला बळ मिळेल आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली राज्याला प्रगतीच्या मार्गावर नेण्यास मदत होईल.