गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात झूलता पूल कोसळला; बचावकार्य सुरू

बचाव व मदतकार्याच्या पथकासोबत स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला आहे. अनेक जण नदीत उतरून लोकांना बाहेर काढत आहेत
गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात झूलता पूल कोसळला; बचावकार्य सुरू

गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात देशातील पुरातन वास्तू ठेव्याचा वारसा लाभलेला १४० वर्षे जुना मच्छू नदीवरील झूलता पूल कोसळल्याची दुर्घटना रविवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. यात पुलावरील ४०० जण नदीत पडले. गुजरातचे मंत्री ब्रजेश मेरजा यांनी या दुर्घटनेत ६० जणांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले, तर १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांत २५ मुलांचा समावेश आहे. या दुर्घटनेची जबाबदारी गुजरात सरकारने घेतली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बचाव व मदतकार्य वेगाने सुरू झाले आहे.

बचाव व मदतकार्याच्या पथकासोबत स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला आहे. अनेक जण नदीत उतरून लोकांना बाहेर काढत आहेत. मच्छू नदीवर बनलेला हा केबल पूल जवळपास १४० वर्षे जुना आहे. त्याची गणना पुरातन वारसा वास्तूमध्ये (हेरिटेज) केली जाते. हा पूल दुरुस्तीसाठी सात महिने बंद होता. दिवाळीला गुजराती नववर्षाच्या दिवशी दुरुस्तीनंतर तो पुन्हा सुरू केला होता. या घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. बचावकार्यासाठी तातडीने एसडीआरएफची पथके, अग्निशमन दल, स्टीमर पाठवण्याच्या सूचना केल्या आहेत. दुर्घटनाग्रस्त नागरिकांना तातडीने मदत करावी, अशा सूचना पंतप्रधानांनी दिल्या आहेत.

गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांघवी हे मोरबीला रवाना झाले आहेत. ते म्हणाले की, ही घटना दु:खदायक आहे. पूल कोसळल्यानंतर १५ मिनिटांत अग्निशमन दल, जिल्हाधिकारी, डॉक्टर व रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. केंद्र सरकारकडून राज्य सरकारला सर्व प्रकारची मदत मिळत आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे.

या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान निधीतून दोन लाख रुपये, तर जखमींना ५० हजार दिले जातील. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाख, तर प्रत्येक जखमीला ५० हजार देण्याची घोषणा केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दुर्घटनेबाबत चिंता व्यक्त केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दु:ख व्यक्त केले. याबाबत आपण गृहराज्यमंत्री हर्ष संघवी व अन्य अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. एनडीआरएफचे महासंचालक अतुल करवाल म्हणाले की, मोरबी दुर्घटनेनंतर एनडीआरएफच्या तीन टीम पाठवल्या आहेत.

मोरबीचा हा पूल १४० वर्षे जुना असून, त्याची लांबी ७६५ फूट आहे. हा पूल देशात पुरातन ठेवा आहे. या पुलाचे उद‌्घाटन २० फेब्रुवारी १८७९ मध्ये मुंबईचे गव्हर्नर रिचर्ड टेम्पल यांनी केले होते. त्या काळात याला ३.५ लाख रुपये खर्च आला होता. या पुलाचे सर्व सामान त्यावेळी इंग्लंडहून मागवले होते.

फिटनेस प्रमाणपत्राशिवाय पूल खुला

या पुलाच्या नूतनीकरणाचे काम सरकारी कंत्राटदार ओरेवा समूहाला दिले होते. फिटनेस प्रमाणपत्र दिल्याशिवाय हा पूल खुला केला होता, अशी माहिती मोरबी मनपाच्या अधिकाऱ्यांनी दिले. मोरबी सरकारी रुग्णालयाचे डॉ. प्रदीप दूधरजिया म्हणाले की, आतापर्यंत ६० जण या दुर्घटनेत ठार झाले आहेत. रुग्णालयात अनेक मृतदेह आणण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in