
संगीत क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. रॅपर अभिनव सिंह उर्फ जगरनॉटचा (वय 32) संशयास्पद मृत्यू झाला आहे. बंगळुरूतील कडुबसनहल्ली येथे राहत असलेल्या भाड्याच्या घरात तो मृतावस्थेत आढळला. तो शहरातील एका खासगी कंपनीत काम करत होता. त्याने आपले जीवन संपवल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, पोलीस वेगवेगळ्या दृष्टिकोनातून या प्रकरणाचा तपास करत आहेत.
कुटुंबीयांचा अभिनवच्या पत्नीवर मानसिक त्रासाचा आरोप
शवविच्छेदनांनतर स्थानिक पोलिसांनी अभिनवचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे. दरम्यान, अभिनवच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की त्याची पत्नी आणि इतर काही जणांनी त्याला मानसिक त्रास दिला. अहवालात असे म्हटले आहे की, पत्नीने केलेल्या खोट्या आरोपांमुळे त्रस्त होऊन त्याने विष पिऊन आपले जीवन संपवले.
'ओडिशा टीव्ही'च्या माहितीनुसार, अभिनवचे वडील, बिजय नंद सिंह यांनी पोलिसात औपचारिक तक्रार केली आहे, ज्यात त्यांनी ८-१० लोकांवर आरोप केले आहेत आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पोलिसांनी एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन पुरावे एकत्र करायला सुरुवात केली आहे. अभिनवच्या मृत्यूचे नेमके कारण अनिश्चित असले तरी, पोलीस या प्रकरणाच्या सर्व प्रकारच्या शक्यता तपासून पाहत आहेत.
अभिनव सिंह कोण होता?
अभिनव हा ओडिशातील पहिल्या स्वतंत्र 'हिप हॉप लेबल अर्बन लोफर'चा (Hip Hop Label Urban Loafer) संस्थापक होता. त्याने 'कटक अँथम' या हिट ट्रॅकने ओळख मिळवली. तो चाहत्यांमध्ये 'जगनॉट' नावाने प्रसिद्ध होता. त्याची गाणी ओडिसातील स्थानिक सांस्कृतिक गोष्टींनी भरलेली असल्यामुळे ती लोकप्रिय ठरली.
मात्र, अभिनव अनेक वेळा वादग्रस्त प्रकरणात अडकला होता. ऑगस्ट २०२४ मध्ये, ऑलीवुड (Ollywood) अभिनेत्री सुप्रियाने त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. ज्यात तिने दावा केला की त्याने तिच्या संगीत व्हिडिओच्या प्रदर्शनात अडथळा आणला आणि तिला शारीरिक मारहाणही केली.
याव्यतिरिक्त, भुवनेश्वरमधील OYO हॉटेलमध्ये त्याच्या पत्नीने तक्रार दाखल केल्यानंतर तो आणखी एका वादात सापडला होता. यामुळे प्रशासनाने ते हॉटेल सील केले होते.