बनावट मतदार हटल्याने भाजपचा विजय निश्चित; बंगाल निवडणुकीबाबत शुभेंदू अधिकारींचा दावा

बंगालच्या मतदारयादीतून ७९ लाख 'बनावट' नावे हटवण्यात आली असल्याने भाजप प्रचंड बहुमताने नक्की विजयी होईल असा दावा त्या पक्षाचे नेते शुभेंदू अधिकारी यांनी केला आहे. भाजप राज्यात १७७ हून अधिक जागा जिंकेल असे भाकितही त्यांनी केले आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

कोलकाता : बंगालच्या मतदारयादीतून ७९ लाख 'बनावट' नावे हटवण्यात आली असल्याने भाजप प्रचंड बहुमताने नक्की विजयी होईल असा दावा त्या पक्षाचे नेते शुभेंदू अधिकारी यांनी केला आहे. भाजप राज्यात १७७ हून अधिक जागा जिंकेल असे भाकितही त्यांनी केले आहे.

पश्चिम बंगालमधील २०२६ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्या पार्श्वभूमीवर अधिकारी यांचा दावा महत्वाचा आहे. अधिकारी यांनी असा आरोप केला की, हटवण्यात आलेल्या नावांपैकी ९०% नावे ही तृणमूल काँग्रेसचे समर्थक होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपली व्होट बँक वाचवण्यासाठी "बांगलादेशी मुस्लिम घुसखोरांचे" संरक्षण करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

अधिकारी यांनी नावे हटवण्याच्या प्रक्रियेचे वर्णन करण्यासाठी जेवणाच्या वेळांचे रुपक वापरले. त्यानुसार नाश्त्याला म्हणजे प्राथमिक गणनेत ५८ लाख नावे हटवण्यात आली. दुपारच्या जेवणात म्हणजे २८ फेब्रुवारीच्या यादीच्या अंतिम प्रकाशनाच्या वेळी सात लाख नावे गाळली गेली. तर नुकत्याच प्रसिध्द झालेल्या पूरक यादीत म्हणजे संध्याकाळच्या चहाच्या वेळी १४ लाख नावे हटवली गेली असे अधिकारी म्हणाले.

आकडेवारीबाबत संभ्रम

दरम्यान, निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार एसआयआर प्रक्रियेनंतर ६३.६६ लाख नावे कमी केली गेली आहेत. परंतु अधिकारी यांनी दावा केलेल्या अतिरिक्त १४ लाख नावांच्या हटवण्याबाबत आयोगाने अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

बंगाल निवडणूक संग्राम

१७७+ जागांचे लक्ष्य: २९४ सदस्यांच्या विधानसभेत भाजप किमान १७७ जागा जिंकेल (बहुमतासाठी १४८ जागांची गरज असते), असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. २०१६ मध्ये भाजपने ३, तर २०२१ मध्ये ७७ जागा जिंकल्या होत्या.

प्रमुख लढत: २०२१ च्या तुलनेत यावेळी एक मोठा बदल म्हणजे, ममता बॅनर्जी नंदीग्रामऐवजी कोलकाता येथील भवानीपूर मतदारसंघातून शुभेंदु अधिकारी यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत.

"सनातनी" प्रचार: अधिकारी यांनी ही निवडणूक "राष्ट्रवादी आणि सनातनी सरकार" स्थापन करण्यासाठीची लढाई असल्याचे म्हटले आहे. त्यांनी महिलांना ३,००० रुपये मासिक मदत आणि आयुष्मान भारत योजना लागू करण्याचे आश्वासन दिले आहे.

logo
marathi.freepressjournal.in