(Video) 'आप'कडून राज्यसभेसाठी उमेदवारी मिळताच स्वाती मालीवाल यांचा DCW च्या अध्यक्षपदाचा राजीनामा, पद सोडताना रडू कोसळले

कार्यालय सोडताना त्यांना अश्रू आवरणे कठीण झाले होते. सहकाऱ्यांना निरोप देतानाचा त्यांचा भावूक व्हिडिओ समोर आला आहे.
स्वाती मालीवाल
स्वाती मालीवालएक्स /@ANI

दिल्ली महिला आयोगाच्या (डीसीड्ब्लू) अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी आज, शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आम आदमी पक्षाने राज्यसभेसाठी त्यांना उमेदवारी दिल्यानंतर स्वाती मालीवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यावेळी आपले कार्यालय सोडताना त्यांना अश्रू आवरणे कठीण झाले होते.

सहकाऱ्यांना निरोप देतानाचा त्यांचा भावूक व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये भावूक झालेल्या मालीवाल सहकाऱ्यांना मिठी मारताना दिसत आहेत. मालीवाल यांच्या शेवटच्या दिवशी सहकाऱ्यांनाही रडू कोसळले. दिल्ली महिला आयोगात रुजू होण्यापूर्वी मालीवाल यांनी जनतेच्या तक्रारींबाबत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हणून काम केले होते. अरविंद केजरीवाल यांच्या इंडियन अगेन्स्ट करप्शन चळवळीत त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

राजीनामा दिल्यानंतर स्वाती मालीवाल यांना अश्रू अनावर

'आप'कडून राज्यसभेसाठी उमेदवारी

'आप'ने शुक्रवारी मालीवाल यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली. दिल्लीत राज्यसभेच्या जागांसाठी १९ जानेवारीला मतदान होणार आहे. संजय सिंह, सुशीलकुमार गुप्ता आणि नारायण दास गुप्ता हे दिल्लीतील राज्यसभेचे तीन सदस्य २७ जानेवारीरोजी निवृत्त होत आहेत.

'आप'ने नारायण दास गुप्ता आणि संजय सिंह यांना पुन्हा उमेदवारी दिली असली, तरी सुशीलकुमार गुप्ता यांना हरियाणाच्या राजकारणाकडे आपले लक्ष केंद्रित करायचे आहे. ते 'आप'च्या हरियाणा शाखेचे अध्यक्ष आहेत. या वर्षाच्या अखेरीस तेथे निवडणुका होण्याची शक्यता आहे.

डीसीडब्ल्यूच्या आठ वर्षांतील कामाची माहिती दिली -

मालीवाल यांनी आज एक व्हिडिओ जारी करत दिल्ली महिला आयोगाने गेल्या आठ वर्षांत केलेल्या कामांची माहिती दिली. 'दिल्ली महिला आयोगाने गेल्या आठ वर्षांत १ लाख ७० हजारांहून अधिक तक्रारींचे निवारण केले. आम्ही केंद्र सरकार, दिल्ली पोलिस आणि राज्य सरकारला 500 हून अधिक शिफारशी सादर केल्या आहेत. याव्यतिरिक्त, आम्ही 60 हजारांहून अधिक लैंगिक अत्याचार पीडितांसाठी समुपदेशन केले आहे आणि आमच्या वकिलांनी 2 लाख न्यायालयीन सुनावणींमध्ये त्यांना थेट मदत केली आहे, असे त्या म्हणाल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in