स्विस विमानाच्या इंजिनमध्ये आग; सहा प्रवासी जखमी

दिल्ली विमानतळावर टेकऑफ करताना स्विस विमानाचे इंजिन निकामी झाले. स्विस एअरलाइन्सचे ‘एलएक्स१४७’ हे विमान शनिवारी मध्यरात्री १.०८ वाजता टेकऑफ करणार होते.
स्विस विमानाच्या इंजिनमध्ये आग; सहा प्रवासी जखमी
स्विस विमानाच्या इंजिनमध्ये आग; सहा प्रवासी जखमी(Photo-X)
Published on

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळावर टेकऑफ करताना स्विस विमानाचे इंजिन निकामी झाले. स्विस एअरलाइन्सचे ‘एलएक्स१४७’ हे विमान शनिवारी मध्यरात्री १.०८ वाजता टेकऑफ करणार होते. तेव्हा त्याचे एक इंजिन निकामी झाले आणि त्याला आग लागली. त्यानंतर वैमानिकाने तत्काळ विमान थांबवले. तसेच सर्व प्रवाशांना रनवेवर आपत्कालीन स्लाइडचा वापर करून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. विमानातून खाली उतरताना चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. यावेळी ६ प्रवासी जखमी झाले. त्याचवेळी विमानतळावर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी विमानांच्या लँडिंग गिअरला लागलेली आग विझवली. हे विमान स्वित्झर्लंडमधील झुरिचला जाणार होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कऑफच्या वेळी लँडिंग गिअरमधून दिसला धूर

स्विस एअरलाइनने एका निवेदनात म्हटले आहे की, आम्हाला दिल्लीतील फ्लाइट ‘एलएक्स१४७’ शी संबंधित एका घटनेची माहिती मिळाली असून ज्या विमानात बिघाड झाला ती एअरबस ए ३३० आहे. ही घटना भारतीय वेळेनुसार रात्री १ वाजल्यानंतरची आहे. विमान टेकऑफ करण्यासाठी धावपट्टीवर येताच, विमानाच्या डाव्या बाजूच्या लँडिंग गिअरमधून धूर निघताना दिसला. त्यानंतर लगेचच विमान थांबविण्यात आले. एअरलाइनने सांगितले की, आमचे स्थानिक पथक घटनास्थळी उपस्थित असून प्रवाशांची काळजी घेत आहे. आम्ही स्थानिक अधिकाऱ्यांसोबत या प्रकरणावर काम करत आहोत. या घटनेमागील कारणे पूर्णपणे समजून घेण्यासाठी आमचे पथक लवकरच दिल्लीला जाईल.

दिल्ली विमानतळावर १० दिवसांत दुसरी मोठी घटना

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या १० दिवसांत विमान अपघाताची ही दुसरी मोठी घटना आहे. १६ एप्रिल रोजी स्पाइसजेट आणि अकासा एअरची विमाने एकमेकांवर आदळली होती. अकासाचे विमान हैदराबादला जाण्यासाठी तयार उभे होते. त्याच वेळी लेहहून आलेले स्पाइसजेटचे विमान त्याला धडकले. अपघातात स्पाइसजेटच्या उजव्या पंखाचा भाग अकासाच्या डाव्या बाजूच्या मागील पंखात घुसला. घटनेनंतर विमानतळ कर्मचाऱ्यांनी दोन्ही विमानांमधील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवले. अपघातात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नव्हती.

logo
marathi.freepressjournal.in