
अमेरिकेतून प्रत्यार्पण करून भारतात आणलेल्या तहव्वुर हुसेन राणाला शुक्रवारी विशेष एनआयए न्यायालयाने १८ दिवसांच्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले. या काळात त्याची सखोल चौकशी करून मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याच्या संपूर्ण कटाचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
एनआयएच्या अत्यंत सुरक्षित कोठडीत ठेवणार
अमेरिकेतून यशस्वी प्रत्यार्पणानंतर, गुरुवारी संध्याकाळी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावरच राणाला औपचारिकपणे अटक केल्यानंतर एनआयएने त्याला पटियाला हाऊस येथील NIA विशेष न्यायालयात हजर केले. गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या ९० मिनिटांच्या बंद दाराआड सुनावणीनंतर शुक्रवारी न्यायालयाने राणाला १८ दिवसांच्या एनआयए कोठडीत पाठवले, त्यानंतर त्याला पटियाला हाऊस कोर्ट कॉम्प्लेक्समधून दिल्ली पोलिसांच्या SWAT आणि इतर सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या कडक सुरक्षा व्यवस्थेत एनआयए मुख्यालयात नेले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, राणाला येथील सीजीओ कॉम्प्लेक्समधील एनआयएच्या मुख्य कार्यालयातील अत्यंत सुरक्षित कोठडीत ठेवण्यात येईल.
कट उलगडण्यासाठी सविस्तर चौकशी
"राणा १८ दिवसांसाठी एनआयए कोठडीत राहील, या काळात एजन्सी २००८ च्या दहशतवादी हल्ल्यामागील संपूर्ण कट उलगडण्यासाठी त्याची सविस्तर चौकशी करेल, ज्यामध्ये एकूण १६६ लोक मारले गेले आणि २३८ हून अधिक जखमी झाले," असे न्यायालयाच्या आदेशानंतर लगेचच तपास यंत्रणेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. विशेष न्यायालयाच्या आदेशानुसार एनआयएने त्याला ताब्यात घेतले, असे त्यात म्हटले आहे.
अमेरिकेकडून त्याच्या प्रत्यार्पणाला हिरवा सिग्नल मिळाल्यानंतर भारतीय पथकाने त्याला अमेरिकन ‘गल्फस्ट्रीम जी-५५०’ या विमानाने दिल्लीच्या पालम विमानतळावर आणले. २००८च्या मुंबई हल्ल्यातील सहभागप्रकरणी तहव्वूर हुसैन राणा अमेरिकेत शिक्षा भोगत होता. मे २०२३ मध्ये तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेतील कोर्टाने मंजुरी दिली होती. या निर्णयाला राणाने अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टात याचिकेद्वारे आव्हान दिले होते. मात्र, ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली होती. तहव्वूर राणा हा त्याचा मित्र डेव्हिड हेडली याच्यासह डेन्मार्कमध्ये मुंबईवर हल्ला घडवून आणण्याच्या आणि हल्ल्याची योजना आखल्याच्या आरोपाखाली २०१३ मध्ये दोषी आढळला होता. अमेरिकन कोर्टाने त्याला १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.