मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो! तहव्वूर राणाच्या चौकशीत धक्कादायक गौप्यस्फोट

मुंबईवर २६/११ रोजी करण्यात आलेल्या दहशतवाही हल्ल्याचा एक मुख्य सूत्रधार तहव्वूर राणा याने चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत.
मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो! तहव्वूर राणाच्या चौकशीत धक्कादायक गौप्यस्फोट
Published on

नवी दिल्ली : मुंबईवर २६/११ रोजी करण्यात आलेल्या दहशतवाही हल्ल्याचा एक मुख्य सूत्रधार तहव्वूर राणा याने चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. मी पाकिस्तानी सैन्याचा विश्वासू हस्तक होतो, तसेच आखाती युद्धादरम्यान मला सौदी अरेबियामध्ये तैनात करण्यात आले होते, असे त्याने सांगितले.

कॅनडाचा नागरिक असलेल्या तहव्वूर राणाचे एप्रिल महिन्यात अमेरिकेमधून भारताकडे प्रत्यार्पण करण्यात आले. तहव्वूर राणा याने चौकशीदरम्यान सांगितले की, मुंबईमध्ये २००८ साली दहशतवादी हल्ल्यापूर्वी मी मुंबईतील अनेक महत्त्वपूर्ण ठिकाणांची रेकी केली होती. तसेच ‘इमिग्रेशन बिझनेस’च्या माध्यमातून डेव्हिड हेडली याला मुंबईमध्ये एक बनावट कार्यालय उघडण्यास मदत केली होती. त्याचा वापर मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यासाठी केला होता.

जवळपास १७ वर्षांपूर्वी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. दरम्यान, या हल्ल्यातील प्रमुख सूत्रधारांपैकी एक असलेल्या तहव्वूर राणा याला भारतात आणण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले. सध्या एनआयएच्या कोठडीत असलेल्या तहव्वूर राणाची मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचने नुकतीच कसून चौकशी केली. दरम्यान, एनआयएमधील सूत्रांनी सांगितले की, लष्कर-ए-तोयबा आणि पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ या गुप्तचर यंत्रणेमध्ये असलेले साटेलोटे तहव्वूर राणा याने उघड केले आहे. मी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या म्होरक्यांसोबत मिळून मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा कट आखत होतो, अशी माहिती त्याने दिली. दरम्यान, डेव्हिड हेडली आणि त्याच्यामध्ये झालेली ई-मेलची देवाणघेवाण, प्रवासाचे तपशील आणि इतर पुराव्यांचे विश्लेषण केले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in