
नवी दिल्ली : २००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याला भारतात आणण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून आज (दि.१०) कोणत्याही क्षणी त्याला भारतात आणले जाईल. तहव्वूरच्या प्रत्यार्पणासाठी ‘एनआयए’ ही तपास संस्था आणि गुप्तचर संस्था ‘रॉ’चे संयुक्त पथक अमेरिकेत उपस्थित आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमला सतर्क ठेवण्यात आले आहे आणि विमानतळावर SWAT कमांडो आधीच तैनात करण्यात आले आहेत.
तहव्व्वूर राणाला गुरुवारी दुपारपर्यंत भारतात आणले जाईल, असे समजते. त्याला लष्करी विमानाने वा विशेष विमानाने भारतात आणले जाईल. दरम्यान, २६/११ चा दीर्घकाळ प्रलंबित खटला दिल्लीत चालवण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) केंद्रीय कायदा मंत्रालयाकडून अधिकृत मंजुरी मिळाली असल्याचे समजते. त्यामुळे भारतात आणल्यानंतर राणाला विशेष बंदोबस्तात दिल्लीतील कारागृहात ठेवले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
राणाच्या प्रत्यार्पणाला रोखण्यासाठीची याचिका सोमवारी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. पार्किन्सनचा आजार असल्यामुळे आपल्याला भारतात नेले जाऊ नये, यासाठी तहव्वूरने याचिका दाखल केली होती. राणाला २००९ मध्ये एफबीआयने अटक केली होती. भारत सतत तहव्वूर राणाच्या प्रर्त्यापणाची मागणी करत होता.
फेब्रुवारीमध्ये अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात एक बैठक झाली होती. यावेळी, अमेरिकेने एका अतिशय धोकादायक दहशतवाद्याला भारतात शिक्षा भोगण्यासाठी पाठवण्याची परवानगी दिली आहे, असे ट्रम्प यांनी सांगितले होते. अखेर आता त्याला भारतात आणले जात आहे.
मुंबई हल्ल्याची ब्ल्यू प्रिंट तयार केली
राणा मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड डेव्हिड कोलमन हेडली उर्फ दाऊद गिलानीचा जवळचा सहकारी मानला जातो. हल्ल्याअगोदर तहव्वूर आणि हेडली यांची अनेकदा बैठक झाली होती. राणा-हेडलीने मुंबई हल्ल्याची ब्ल्यू प्रिंट तयार केली होती, मुंबई पोलिसांच्या आरोपपत्रानुसार, राणा भारतात आल्यानंतर हल्ल्याचे ठिकाण आणि राहण्याची ठिकाणे सांगून दहशतवाद्यांना मदत करत होता. राणानेच ब्ल्यू प्रिंट तयार केली होती, ज्याच्या आधारे हा हल्ला करण्यात आला होता. राणा आणि हेडलीने दहशतवादी कट रचला होता. मुंबई हल्ल्याचा कट रचण्यात राणाची मोठी भूमिका होती, असे आरोपपत्रात म्हटले आहे.
राणाला अमेरिकेत ‘लष्कर-ए-तोयबा’ला पाठिंबा दिल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते. तो सध्या लॉस एंजेलिसमधील एका डिटेंशन सेंटरमध्ये आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी ‘लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेच्या १० दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला. मुंबईतील लिओपोल्ड कॅफे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ताजमहाल हॉटेल पॅलेस, ओबेरॉय ट्रायडंट, कामा हॉस्पिटल, नरिमन हाऊस, मेट्रो सिनेमा आणि सेंट झेवियर्स कॉलेज येथे झालेल्या हल्ल्यात १७५ जणांना प्राण गमवावे लागले. तर ३०० हून अधिक लोक जखमी झाले.