Tahawwur Rana Extradition : राणाला १८ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी दहशतवादी तहव्वूर राणा याचे गुरुवारी अमेरिकेकडून भारताकडे प्रत्यार्पण करण्यात आल्यानंतर त्याला गुरुवारी रात्री दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले.
Tahawwur Rana Extradition : राणाला १८ दिवसांची न्यायालयीन कोठडी
Published on

नवी दिल्ली : मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी दहशतवादी तहव्वूर राणा याचे गुरुवारी अमेरिकेकडून भारताकडे प्रत्यार्पण करण्यात आल्यानंतर त्याला गुरुवारी रात्री दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची १८ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. ‘एनआयए’ने विशेष न्यायालयाकडे २० दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. दरम्यान, राणाची चौकशी केवळ १२ अधिकाऱ्यांनाच करता येऊ शकणार आहे.

तहव्वूर राणाला गुरुवारी एका विशेष विमानाने दिल्लीच्या पालम विमानतळावर आणण्यात आले. त्यानंतर ‘एनआयए’ने त्याला औपचारिकपणे अटक केली. तत्पूर्वी, विमान भारतात उतरल्यानंतर, तहव्वूर राणाला कडक सुरक्षेत विमानतळावरून पटियाला हाऊस कोर्टात आणण्यात आले. त्याला विशेष ‘एनआयए’ न्यायाधीश चंद्रजीत सिंह यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी तहव्वूर राणाची बाजू कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे वकील पियूष सचदेवा यांनी मांडली. ‘एनआयए’चे प्रतिनिधित्व ज्येष्ठ वकील दयान कृष्णन आणि विशेष सरकारी वकील नरेंद्र मान यांनी केले.

‘एनआयए’च्या मुख्यालयात एक चौकशी कक्ष स्थापन करण्यात आला असून या कक्षात तपासाशी संबंधित केवळ १२ अधिकाऱ्यांनाच प्रवेशाची मुभा आहे. न्यायाधीशांना संपूर्ण प्रकरणाची आणि वैद्यकीय अहवालाची माहितीही देण्यात आली. ताब्यात घेतल्यानंतर, तहव्वूर राणाची आता ‘एनआयए’ मुख्यालयात चौकशी केली जाणार आहे.

‘एनआयए’ मुख्यालयात एक चौकशी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षात तपासाशी संबंधित फक्त १२ सदस्यांना प्रवेश असणार आहे. यामध्ये ‘एनआयए’चे डीजी सदानंद दाते, आयजी आशिष बत्रा, डीआयजी जया रॉय यांचा समावेश आहे.

दहशतवाद्यांना तहव्वूर राणाला पाकिस्तानचा ‘निशान-ए-हैदर’ पुरस्कार द्यायचा होता, असा खुलासा अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या अहवालात केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in