
आग्रा : ताज महालच्या पश्चिम प्रवेशद्वाराजवळ मोटारीतून आलेल्या दोन तरुणांना पोलिसांना अडवल्याने त्यांनी संतप्त होऊन हवेत गोळीबाराच्या तीन फैरी झाडल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अमरूद टीला येथील पोलीस बॅरियरजवळ एक गाडी प्रतिबंधित क्षेत्रात घुसण्याचा प्रयत्न करत असताना हा प्रकार घडला.
सकाळी ९ वाजताच्या सुमारास, यूपी ८५ क्रमांकाच्या गाडीतील तरुणांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, गाडीमधील तरुणांनी प्रथम कर्मचाऱ्यांशी वाद घातला. त्यानंतर त्यांनी गाडी वळवली आणि काही अंतरावर जाऊन हवेत तीन गोळ्या झाडल्या. गोळीबाराच्या आवाजाने घटनास्थळी उपस्थित पर्यटक आणि स्थानिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली.
आरोपींची ओळख पटवली
या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली. घटनास्थळी त्वरित मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, संपूर्ण परिसराला वेढा घालण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असून, गाडीच्या क्रमांकावरून आरोपींची ओळख पटवण्यात आली आहे. मथुरा पोलिसांशी संपर्क साधून आरोपींचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.
सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे ताज महालसारख्या जगप्रसिद्ध आणि संवेदनशील ठिकाणाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून, आरोपींना लवकरच अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे. काही सुरक्षा कर्मचारी कर्तव्यावर असताना मोबाइल फोनमध्ये व्यस्त असतात, ज्यामुळे अशा घटना घडत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, आता पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सुरक्षेतील त्रुटी शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.