पीठासीन अधिकाऱ्यावर कारवाई करा, चंदिगड महापौर निवडणूकप्रकरणी SC चे निर्देश; फेरनिवडणुकीऐवजी दिली नवी व्यवस्था

चंदिगड महापौर निवडणुकीतील पीठासीन अधिकारी अनिल मसिह यांनी निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले.
पीठासीन अधिकाऱ्यावर कारवाई करा, चंदिगड महापौर निवडणूकप्रकरणी SC चे निर्देश; फेरनिवडणुकीऐवजी दिली नवी व्यवस्था

चंदिगड : चंदिगड महापौर निवडणुकीतील पीठासीन अधिकारी अनिल मसिह यांनी निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. अनिल मसिह यांनी ८ मतपत्रिकांवर फेरफार केल्याचे मान्य केल्यानंतर यांच्याविरुद्ध स्वतंत्र खटला चालवावा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. निवडणुका अशाप्रकारे घेतल्या जातात का? ही लोकशाहीची थट्टा आहे. ही लोकशाहीची हत्या आहे. या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने संताप व्यक्त केला. तसेच, घोडेबाजाराविषयी चिंता व्यक्त करतानाच, याआधी झालेल्या मतदानाच्या आधारेच निकाल देण्याचे संकेत न्यायालयाने दिले.

३० जानेवारी रोजी झालेल्या चंदिगड महापौर निवडणुकीदरम्यान भाजपने मतपत्रिकांमध्ये छेडछाड केल्याचा आरोप ‘आप’ आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला होता. ‘आप’ने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सोमवारी सुनावणी होण्याआधी चंदिगडचे नवनिर्वाचित महापौर मनोज सोनकर यांनी रविवारी रात्री उशिरा महापौरपदाचा राजीनामा दिला होता.

चंदिगडच्या महापौरपदासाठी ३० जानेवारीला मतदान झाले होते. आप आणि काँग्रेस या पक्षांनी इंडिया आघाडीअंतर्गत पहिल्यांदाच निवडणूक लढवली. या निवडणुकीत भाजपला १६ मते मिळाली, तर आपचे उमेदवार कुलदीप टिटा यांना १२ मते मिळाली, मात्र त्यांची ८ मते अवैध ठरवण्यात आली. निवडणूक अधिकारी अनिल मसिह यांनी ८ मतपत्रिकांमध्ये फेरफार केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

फेरनिवडणुकीऐवजी नवी व्यवस्था

सुप्रीम कोर्टाने सोमवारी चंदिगडच्या महापौरपदाची निवडणूक पुन्हा घेण्याऐवजी नवी व्यवस्था दिली. सध्याच्या बॅलेट पेपरची मोजणी करून चंदिगडच्या महापौरांची निवड करावी, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. यामध्ये रिटर्निंग ऑफिसरने ज्या बॅलेट पेपरवर चिन्हांकित केले होते त्या बॅलेट पेपर्सचा समावेश नसावा. मतपत्रिका न्यायालयात सादर करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल यांना मतपत्रिका आणि व्हिडीओ न्यायालयात आणण्यासाठी न्यायिक अधिकारी नियुक्त करण्यास सांगितले. मंगळवारी दुपारी २ वाजता सुप्रीम कोर्ट निवडणुकीचे संपूर्ण व्हिडीओ आणि मतपत्रिका तपासणार आहे.

‘आप’चे ३ नगरसेवक भाजपमध्ये

सुनावणी होण्याआधी रविवारी रात्री आम आदमी पार्टीच्या (आप) ३ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पूनम देवी, नेहा मुसावत आणि गुरचरणजीत सिंग काला यांना पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी भाजपचे सदस्यत्व दिले.

logo
marathi.freepressjournal.in