
न्या. यू. यू. लळित यांनी शनिवारी देशाचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित एका छोटेखानी सोहळ्यात त्यांना सरन्यायाधीशपदाची शपथ दिली. न्या. लळित यांनी तीन महत्त्वपूर्ण न्यायालयीन सुधारणांचे आश्वासन दिले आहे.
लळित यांनी एन. व्ही. रमणा यांची जागा घेतली. ते येत्या ९ नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होतील. सरन्यायाधीश म्हणून लळित यांचा कार्यकाल अवघा ७४ दिवसांचा असेल. अल्पावधीत कालावधीत त्यांना सुप्रीम कोर्टात प्रलंबित ४९२ घटनात्मक खटल्यांचा निपटारा करावा लागेल. फौजदारी कायद्याचे तज्ज्ञ असलेल्या न्यायमूर्ती लळित यांची १३ ऑगस्ट २०१४ रोजी सुप्रीम कोर्टात नियुक्ती झाली. बार कौन्सिलमधील वकील म्हणून काम केलेले लळित हे दुसरे सरन्यायाधीश आहेत. न्या. उदय उमेश लळित यांचे सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील गिर्ये-कोठारवाडी हे मूळ गाव. त्यांचे आजोबा वकिलीनिमित्त सोलापूरला स्थायिक झाले.