देशातील सर्वच राजकीय पक्ष हे २०२४ च्या लोकसभा निवडणुकच्या मोर्चे बांधणीला लागले आहेत. अशात एआयएडीएमके पक्षाने भाजपसोबत सर्व प्रकारचे संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. एआयएडीएमके पक्षाने भाजपसोबत सर्व प्रकारचे संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. एआयएडीएमके पक्षाने भाजप आणि एनडीएसोबतचे कोणत्याही प्रकारचे संबंध न ठेवण्याचा ठराव पक्षाच्या बैठकीत मंजूर केला आहे. एएनआय या वृत्त संस्थेने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
एआयएडीएमके समन्वयक के पी मुनुसामी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. पक्षाने हा निर्णय घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला आहे. पक्ष कार्यालयाच्या बाहेर फटाके फोडून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. एआयएडीएमकेच्या निर्णयामुळे भाजपला तामिळनाडूत हातपाय पसरणं अवघड होणार आहे.
भाजप नेत्यांकडून वारंवार एआयएडीएमकेच्या माजी नेत्यांवर टीका केली जात होती. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. भाजप आणि एनडीएसोबतचे सर्व संबंध तोडले आहे. लोकसभेला काही महिने बाकी असताना हा निर्णय घेण्यात आल्याने हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
तामिळनाडूचे भाजप प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई यांनी वारंवार एआयएडीएमके पक्षाच्या दिवंगत नेत्यांवर टीका केली. पक्षाचे मार्गदर्शक दिवंगत माजी मुख्यमंत्री सीएन अन्नादुराई आणि माजी मुख्यमंत्री जयललीता यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर अन्नामलाई यांनी माफी मागावी किंवा भाजपने नेतृत्व बदलावं अशी मागणी एआयएडीएमके पक्षाकडून करण्यात आली आहे. दरम्यान, आज अखेर एआयएडीएमके या पक्षाने भाजप सोबत संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे.