तमिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; १८ ठार, सहा जण गंभीर जखमी

तमिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यात एका खासगी फटाके निर्मिती कारखान्यात रविवारी झालेल्या भीषण स्फोटात १८ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
तमिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; १८ ठार, सहा जण गंभीर जखमी
तमिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; १८ ठार, सहा जण गंभीर जखमी
Published on

विरुधुनगर : तमिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यात एका खासगी फटाके निर्मिती कारखान्यात रविवारी झालेल्या भीषण स्फोटात १८ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

वचकरपट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कट्टनारपट्टी येथे मुथुमाणिकम यांच्या मालकीच्या 'वनजा' फटाके कारखान्यात हा अपघात झाला. जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर विरुधुनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये तीन महिलांचा समावेश असून त्या ६० टक्के भाजल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हा कारखाना 'पेट्रोलियम अँड एक्स्प्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन'अंतर्गत (पेसो) परवानाधारक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. स्फोटाच्या वेळी संकुलात १०० हून अधिक कामगार कार्यरत होते. कामगार कच्च्या मालाची हाताळणी करत असताना समोरील व्हरांड्यात हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की कारखान्यातील तीन खोल्यांचे ढिगारे झाले असून लगतच्या इमारतींचेही प्रचंड नुकसान झाले आहे.

अग्निशमन दलाच्या जवानांनी अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. मात्र, स्फोटानंतरही फटाके फुटणे सुरूच असल्याने बचावकार्यात अडथळे आले. ढिगाऱ्याखाली आणखी काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून मृतांची ओळख पटवणे कठीण झाले आहे.

सर्वतोपरी मदत करणार - मुख्यमंत्री स्टॅलिन

या घटनेची माहिती मिळताच तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मदत आणि बचावकार्याचा वेग वाढवण्यासाठी दोन मंत्र्यांना तातडीने घटनास्थळी रवाना केले असून जिल्हाधिकाऱ्यांशीही संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली. मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in