

चेन्नई : तमिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या सरकारमधील वाद आता विरोपाला गेला आहे. विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान राष्ट्रगीताचा अवमान झाल्याचा आरोप करत राज्यपालांनी थेट सभागृहातून बहिर्गमन केले. तामिळ गीतासोबतच राष्ट्रगीतही वाजवले जावे, ही राज्यपालांची मागणी विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावल्याने हा पेच निर्माण झाला आहे.
विधानसभेच्या सत्राची सुरुवात परंपरेनुसार तामिळ गीताने झाली. मात्र, राज्यपालांनी आग्रही मागणी केली की तामिळ गीतासोबतच राष्ट्रगीतही वाजवले गेले पाहिजे. या मागणीवरून विधानसभा अध्यक्ष अप्पावू आणि राज्यपाल यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. अध्यक्षांनी ही मागणी मान्य करण्यास नकार दिल्यानंतर, संतापलेल्या राज्यपालांनी अभिभाषण न करताच सभागृहातून काढता पाय घेतला.
राष्ट्रगीताचा अवमान
सभागृहाबाहेर पडल्यानंतर राज्यपालांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. राष्ट्रगीताला योग्य सन्मान दिला जात नाही, याचे मला प्रचंड दुःख वाटते. माझ्या अभिभाषणात वारंवार अडथळे आणले गेले.
मला माझ्या जबाबदारीची पूर्ण जाणीव आहे, पण राष्ट्रगीताचा सन्मान हा सर्वतोपरी असायला हवा, असे आर. एन. रवी यांनी म्हटले आहे. इतकेच नव्हे तर, बोलताना माझा माईक बंद करून माझा अपमान करण्यात आला, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
अध्यक्षांचे प्रत्युत्तर
राज्यपालांच्या आरोपांवर विधानसभा अध्यक्ष अप्पावू यांनी तात्काळ स्पष्टीकरण दिले. विधानसभेत केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना त्यांचे विचार मांडण्याची मुभा असते. कोणीही आपल्या अटी सभागृहावर लादू शकत नाही. सरकारने राज्यपालांच्या भाषणाची सर्व तयारी केली होती, पण त्यांनी स्वतःच नकार दिला, असे अध्यक्षांनी ठणकावून सांगितले.