तारागिरी युद्धनौका नौदलात दाखल; वाढत्या सामर्थ्याचे प्रतीक - राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन

भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात आज मोठी भर पडली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी विशाखापट्टणम येथे अत्याधुनिक स्टेल्थ फ्रिगेट 'आयएनएस तारागिरी' भारतीय नौदलात कार्यान्वित केली.
तारागिरी युद्धनौका नौदलात दाखल; वाढत्या सामर्थ्याचे प्रतीक - राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन
तारागिरी युद्धनौका नौदलात दाखल; वाढत्या सामर्थ्याचे प्रतीक - राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन(Photo-X/@rajnathsingh)
Published on

विशाखापट्टणम : भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात आज मोठी भर पडली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी विशाखापट्टणम येथे अत्याधुनिक स्टेल्थ फ्रिगेट 'आयएनएस तारागिरी' भारतीय नौदलात कार्यान्वित केली. या सोहळ्याला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आणि नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांच्यासह वरिष्ठ नौदल अधिकारी उपस्थित होते.

यावेळी राजनाथ सिंह यांनी जहाजाची पाहणी केली आणि 'तारागिरी'च्या समावेशामुळे भारतीय नौदलाची शक्ती, मूल्ये आणि वचनबद्धता अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाला संबोधित करताना संरक्षण मंत्री म्हणाले, "आमची नौदल शक्ती पर्शियन आखात असो वा मलाक्काची सामुद्रधुनी, हिंदी महासागरात सातत्याने आपली उपस्थिती राखून आहे. जेव्हा जेव्हा कोणतेही संकट येते, मग ते बचावकार्य असो किंवा मानवतावादी मदत पुरवणे, आपले नौदल नेहमीच आघाडीवर असते. आयएनएस तारागिरीचे कार्यान्वयन हे भारताच्या वाढत्या सागरी सामर्थ्याचे प्रतीक आहे."

२०४७ पर्यंत विकसित भारताच्या स्वप्नावर भाष्य करताना सिंह पुढे म्हणाले, "११,००० किलोमीटरहून अधिक किनारपट्टी लाभलेल्या आणि तीन बाजूंनी समुद्राने वेढलेल्या देशाचा विकास समुद्रापासून वेगळा विचार करून करता येणार नाही. आपला जवळपास ९५ टक्के व्यापार सागरी मार्गाने होतो आणि ऊर्जा सुरक्षाही समुद्रावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत सक्षम नौदल ही केवळ निवड नसून आपली गरज आहे."

तारागिरी केवळ युद्धासाठीच नाही, तर आधुनिक राजनैतिक मोहिमा आणि मानवतावादी संकटांच्या वेळीही प्रभावी ठरेल. उच्च-तीव्रतेच्या युद्धापासून ते आपत्ती निवारण आणि मानवतावादी मदतीपर्यंत सर्व प्रकारच्या मोहिमांसाठी ही नौका सज्ज आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील वाढती आव्हाने पाहता, भारताच्या पूर्व किनारपट्टीवर तारागिरीची नियुक्ती धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

प्रमुख वैशिष्ट्ये

'आयएनएस तारागिरी' ही प्रकल्प १७ए वर्गातील चौथी महत्त्वाची युद्धनौका आहे. ६,६७० टन वजनाची ही नौका 'मेक इन इंडिया' भावनेचे आणि स्वदेशी अभियांत्रिकी कौशल्याचे जिवंत उदाहरण आहे.

निर्मिती: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL), मुंबई.

अत्याधुनिक रचना: रेडारला चकवा देण्याची क्षमता (Stealth Feature) आणि आधीच्या डिझाइनपेक्षा अधिक आधुनिक रूप.

आत्मनिर्भर भारत: या युद्धनौकेत ७५ टक्क्यांहून अधिक स्वदेशी साहित्याचा वापर करण्यात आला असून, यात २०० हून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे (MSMEs) योगदान आहे.

तिसरी पाणबुडी

दरम्यान याच कार्यक्रमात अणुऊर्जेवर चालणारी पाणबुडी 'आयएनएस अरिदमन' औपचारिकपणे भारतीय नौदलात सामील करण्यात आली. ही पाणबुडी स्वदेशी बनावटीची असून अरिहंत श्रेणीतील तिसरी अणू पाणबुडी आहे. या पाणबुडीच्या समावेशामुळे भारतीय सैन्यदलांची शक्ती अधिक मजबूत होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in