'टाटा सन्स'ची बैठक लांबणीवर; 'टाटा ट्रस्ट्स'चे अध्यक्ष नोएल टाटांकडून नोटीस कालावधीवर प्रश्न

देशातील सर्वात मोठ्या उद्योग समूहाची होल्डिंग कंपनी असलेल्या ‘टाटा सन्स’ने आपल्या संचालक मंडळाची महत्त्वाची बैठक चार दिवसांनी पुढे ढकलून ३० नोव्हेंबर रोजी घेण्याचा निर्णय सोमवारी घेतला. या बैठकीत कंपनीच्या सूचिबद्धतेच्या पुढील मार्गावर चर्चा होणार होती.
'टाटा सन्स'ची बैठक लांबणीवर; 'टाटा ट्रस्ट्स'चे अध्यक्ष नोएल टाटांकडून नोटीस कालावधीवर प्रश्न
'टाटा सन्स'ची बैठक लांबणीवर; 'टाटा ट्रस्ट्स'चे अध्यक्ष नोएल टाटांकडून नोटीस कालावधीवर प्रश्न
Published on: 

मुंबई : देशातील सर्वात मोठ्या उद्योग समूहाची होल्डिंग कंपनी असलेल्या ‘टाटा सन्स’ने आपल्या संचालक मंडळाची महत्त्वाची बैठक चार दिवसांनी पुढे ढकलून ३० नोव्हेंबर रोजी घेण्याचा निर्णय सोमवारी घेतला. या बैठकीत कंपनीच्या सूचिबद्धतेच्या पुढील मार्गावर चर्चा होणार होती.

‘टाटा ट्रस्ट्स’चे अध्यक्ष नोएल टाटा यांनी रविवारी पाठवलेल्या पत्रात संचालक मंडळाच्या बैठकीसाठी अनिवार्य असलेल्या सात दिवसांच्या नोटीस कालावधीचे पालन झाले नसल्याबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर ही बैठक पुढे ढकलण्याची वेळ आली. बैठकीचा अजेंडा केवळ चार दिवस आधीच देण्यात आला होता, असा आक्षेप घेण्यात आला.

बैठकीचा अजेंडा बदलण्यात आलेला नसून केवळ बैठकीची तारीख पूर्वीच्या २६ नोव्हेंबरवरून ३० नोव्हेंबर करण्यात आली आहे. जेणेकरून सर्व संचालकांना बैठकीची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, अशी माहिती सूत्रांनी दिली. ३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या महत्त्वाच्या बैठकीत ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ने अनिवार्य केलेल्या ‘टाटा सन्स’च्या सूचिबद्धतेशी संबंधित बाबींवर तसेच मध्यवर्ती बँकेच्या विनंतीचे पालन करण्याच्या पुढील मार्गांवर चर्चा होईल, असे सूत्रांनी सांगितले.

समूहाच्या पुढील वाटचालीबाबत सर्वोच्च स्तरावरील मतभेद ‘टाटा सन्स’च्या १७ सप्टेंबर रोजी झालेल्या मागील संचालक मंडळाच्या बैठकीत उघड झाले होते. त्या बैठकीत एन. चंद्रशेखरन यांची अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्याचा आणि ‘आरबीआय’च्या निर्देशांचे पालन करण्याच्या मार्गांचा विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कंपनीतील सर्वात मोठे भागधारक असलेल्या ‘टाटा ट्रस्ट्स’चे अध्यक्ष नोएल हे दोन्ही मतदानांत विरोध करणारे एकमेव संचालक होते, तर ‘ट्रस्ट्स’चे इतर नामनिर्देशित संचालक वेणू श्रीनिवासन यांनी बहुमताच्या बाजूने मतदान केले होते.

टाटा स्टीलची एपीएल अपोलो ट्यूब्समधील हिस्सा खरेदी

‘टाटा स्टील’ने सोमवारी ‘एपीएल अपोलो ट्यूब्स लिमिटेड’मधील प्रवर्तकांचा संपूर्ण २६.६ टक्के हिस्सा १५,५१० कोटी रुपयांना खरेदी करण्याचा करार केल्याचे जाहीर केले. याशिवाय कंपनी १६,७५६ कोटी रुपयांच्या खुल्या प्रस्तावाच्या माध्यमातून या पाईप्स आणि ट्यूब्स उत्पादक कंपनीतील आणखी २६ टक्के हिस्सा ताब्यात घेणार आहे. या व्यवहारामुळे टाटा समूहातील या कंपनीची डाऊनस्ट्रीम उत्पादन क्षमता तिप्पट होणार आहे. या करारामुळे ‘टाटा स्टील’ला स्टील ट्यूब्स आणि कलर-कोटेड उत्पादनांची वार्षिक उत्पादन क्षमता सध्याच्या २.५ दशलक्ष टनांवरून ७.५ दशलक्ष टनांपर्यंत वाढवता येणार आहे. या व्यवहाराची घोषणा होण्याच्या एक दिवस आधीच ‘टाटा स्टील’च्या संचालक मंडळाने स्टील ट्यूब्स व पाईप्स व्यवसाय तसेच ‘टाटा स्टील कलर्स’ २८,००० कोटी रुपयांना ‘एपीएल अपोलो ट्यूब्स’ला विकण्यास मंजुरी दिली होती.

टाटा स्टील-एपीएल अपोलो ट्यूब्सला शेअरमूल्य फटका

मुंबई शेअर बाजारात एपीएल अपोलो ट्यूब्सचा समभाग २१.३९ टक्क्यांनी घसरून १,६६८.१५ रुपयांवर बंद झाला. दिवसाच्या व्यवहारात तो २२.२० टक्क्यांनी गडगडून १,६५१ रुपये या वर्षभरातील नीचांकी पातळीवर पोहोचला होता. व्यवहाराचा फटका टाटा स्टीलच्या समभागांनाही बसला. बीएसईवर टाटा स्टीलचा समभाग ८.१६ टक्क्यांनी घसरून १६३.२५ रुपयांवर बंद झाला. यामुळे टाटा स्टीलचे बाजार भांडवल १८,१०२.५७ कोटी रुपयांनी घटून २,०३,७९२.२० कोटी रुपये झाले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)