प्रेमप्रकरणाच्या कबुलीने तेजप्रतापांची हकालपट्टी

राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांनी शनिवारी दिलेल्या प्रेमप्रकरणाच्या कबुलीमुळे ते स्वत:च अडचणीत आले आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन लालूप्रसाद यादव यांनी तेजप्रताप यांची पक्षातून हकालपट्टी केली असून कौटुंबिक संबंधही तोडले आहेत. सोशल मीडियावरून लालूप्रसाद यादव म्हणाले की, खासगी जीवनात नैतिक मूल्यात घसरण झाल्यास सामाजिक न्यायाचा सामूहिक संघर्ष कमी होतो.
प्रेमप्रकरणाच्या कबुलीने तेजप्रतापांची हकालपट्टी
Published on

पटणा : राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांनी शनिवारी दिलेल्या प्रेमप्रकरणाच्या कबुलीमुळे ते स्वत:च अडचणीत आले आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन लालूप्रसाद यादव यांनी तेजप्रताप यांची पक्षातून हकालपट्टी केली असून कौटुंबिक संबंधही तोडले आहेत. सोशल मीडियावरून लालूप्रसाद यादव म्हणाले की, खासगी जीवनात नैतिक मूल्यात घसरण झाल्यास सामाजिक न्यायाचा सामूहिक संघर्ष कमी होतो. माझ्या ज्येष्ठ मुलाचे वर्तन बेजबाबदारपणाचे, कौटुंबिक मूल्य व संस्काराचा ऱ्हास करणारे आहे. त्यामुळे मी पक्ष व कुटुंबापासून त्याला दूर करत आहे. आता पक्ष, कुटुंबात त्याला कोणतेही स्थान राहणार नाही. पक्षातून त्याला ६ वर्षांसाठी निलंबित केले आहे, असे लालूप्रसाद म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, आपल्या वैयक्तिक जीवनात चांगले-वाईट, गुण-अवगुण आदींची निवड करण्याबाबत तो स्वत: सक्षम आहे. त्याच्याशी जे लोक संबंध ठेवतील त्यांनी ते स्वत:च्या जबाबदारीवर ठेवावेत. सार्वजनिक जीवनात मी कायमच लोकलज्जा बाळगली आहे. माझ्या कुटुंबातील लोकांनीही सार्वजनिक जीवनात त्याचे आचरण केले, असे लालूप्रसाद म्हणाले.

तेजप्रताप यादव यांनी शनिवारी फेसबुकवरून एक पोस्ट केली. त्यात तेजप्रताप यांचे एका मुलीसोबत छायाचित्र पोस्टमध्ये टाकले होते. गेल्या १२ वर्षांपासून या मुलीला मी ओळखतो. आम्ही दोघे प्रेम करतो. मला अनेक दिवसांपासून तुम्हाला ही बाब सांगायची होती. पण, कसे सांगू हे कळत नव्हते. त्यामुळे या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपणास सांगत आहे. तुम्ही मला समजून घ्याल, अशी आशा आहे. ही पोस्ट नंतर तेजप्रताप यादव यांच्या अकाऊंटवरून काढून टाकण्यात आली. मात्र राजकीय वर्तुळात याची मोठी चर्चा सुरू झाली. केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांनी लालूप्रसाद यादव यांच्यावर जोरदार टीका केली.

logo
marathi.freepressjournal.in