दुबई : स्वदेशी बनावटीचे ‘तेजस’ लढाऊ विमान दुबईमध्ये ‘एअर शो’दरम्यान कोसळण्याची धक्कादायक घटना घडली आहे. तेजस विमान ‘एअर शो’ सुरू असताना शुक्रवारी दुपारी कोसळले. याचा काळजाचा थरकाप उडविणारा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तेजस विमानाच्या वैमानिकाचा या अपघातात मृत्यू झाला, असे हवाई दलाने जाहीर केले. दरम्यान, या अपघाताचे कारण निश्चित करण्यासाठी न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
दुबईच्या अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थानिक वेळेनुसार दुपारी २.१० वाजता तेजस विमान कोसळले. याचा व्हिडीओही व्हायरल झाला असून त्यामध्ये तेजस विमान वेगाने जमिनीच्या दिशेने येत असल्याचे दिसत आहे. जमिनीवर कोसळल्यानंतर विमानातून आगीचे लोळ उसळलेले दिसले. विमान जमिनीवर धडकण्यापूर्वी वैमानिकाला बाहेर पडता आले नाही हेही या व्हिडीओतून स्पष्ट झाले.
अपघातानंतर भीतीचे वातावरण
‘हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड’ने (एचएएल) तयार केलेले हे विमान शुक्रवारी दुपारी स्थानिक वेळेनुसार २.१० वाजता हवाई कसरती करत असताना कोसळले. यावेळी हवाई प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळलेली होती. व्हायरल व्हिडीओत अपघाताची भीषणता दिसून येत आहे. आकाशातून वेगात येणारे तेजस जमिनीवर कोसळल्यानंतर लगेचच आगीचा लोळ आणि त्यानंतर काळा धूर उसळल्याचे पाहायला मिळत आहे. या अपघातानंतर एअर शो पाहायला आलेल्या प्रेक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
शो काही काळासाठी थांबविला
दरम्यान, डेमो फ्लाइटदरम्यान तेजस कोसळण्याची घटना घडताच काही मिनिटांतच ‘रेस्क्यू ऑपरेशन’ सुरू करण्यात आले. दुपारच्या सत्रात प्रेक्षकांची सर्वाधिक उपस्थिती असल्याने सावधगिरी म्हणून संपूर्ण एअर शो काही काळासाठी थांबवण्यात आला. अपघातानंतर सुरक्षेच्या दृष्टीने उपस्थित सर्वांना प्रदर्शन क्षेत्राबाहेर हलवण्यात आले असून, अपघाताचे कारण शोधण्याचा तपास सुरू आहे.
विमानाची किंमत ६०० कोटी रुपये
‘दुबई एअर शो’ हा जगातील महत्त्वाचा एव्हिएशन आणि डिफेन्स शो समजला जातो. येथे जगभरातील सुप्रसिद्ध एयरोस्पेस कंपन्या, एअरलाइन्स, विविध देशांच्या वायुसेना आणि डिफेन्स टेक्नॉलॉजी कंपन्या आपले नवीन विमान, हेलिकॉप्टर आणि एव्हिएशन तंत्रज्ञानाचा शो करतात. यावर्षीचा ‘दुबई एअर शो’ पाच दिवसांचा होता आणि शुक्रवारी त्याचा शेवटचा दिवस होता. १९८९ पासून दर दोन वर्षांनी दुबईतील अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे प्रदर्शन आयोजित केले जाते. विशेष म्हणजे, भारतीय तेजस लढाऊ विमान तिसऱ्यांदा या शोमध्ये सहभागी झाले होते. तेजस हे भारताने स्वतः विकसित केलेले लाइट कॉम्बॅट विमान असून त्याची किंमत अंदाजे ६०० कोटी रुपये आहे.
‘तेजस’ची आगळी वैशिष्ट्ये
जगातील सर्वात लहान लढाऊ विमान म्हणून ‘तेजस’ विमानाची ओळख आहे. १९८३ ला या लढाऊ विमानाच्या कार्यक्रमाला मंजुरी मिळाली. त्यानंतर या प्रकल्पाला विविध कारणांनी खूप विलंब होत गेला. जानेवारी २००१ मध्ये विमानाने पहिल्यांदा आकाशात झेप घेतली. विविध प्रकारच्या ‘तेजस’ची निर्मिती करत, सुधारणा करत, चाचण्या करत अखेर २०१५ मध्ये नव्या आवृत्तीचे ‘तेजस १’ लढाऊ विमान भारतीय वायू दलाच्या सेवेत दाखल करण्यात आले. सध्या ३० ‘तेजस १’ वायू दलात कार्यरत आहेत, तर ‘तेजस एमके १ए’ ही तेजसची नवी आवृत्ती असून त्याचे उत्पादन सुरू आहे.