

हैदराबाद : तेलंगणातील विविध गावांमध्ये ५०० हून अधिक भटक्या कुत्र्यांना विष देऊन ठार मारण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ माजली आहे. ग्रामपंचायत निवडणुकांदरम्यान दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याची चर्चा आहे.
प्राणी मित्र संघटनेचे स्वयंसेवक अदुलापुरम गौतम यांनी १२ जानेवारी रोजी पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, कामारेड्डी जिल्ह्यातील भावनीपेट, पलवांचा, फरीदपेट, वाडी आणि बंदारमेश्वरपल्ली या गावांमध्ये भटक्या कुत्र्यांची पद्धतशीर हत्या करण्यात आली. गेल्या दोन ते तीन दिवसांत सुमारे २०० कुत्र्यांना ठार मारण्यात आल्याचा दावा गौतम यांनी केला आहे.
विषारी इंजेक्शन
तक्रारीनुसार, १२ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता या सामूहिक हत्यांची विश्वासार्ह माहिती मिळाल्यानंतर गौतम यांनी सायंकाळी एका मित्रासह भावनीपेट गावाला भेट दिली. तेथे एका मंदिराजवळ अनेक कुत्र्यांचे मृतदेह टाकलेले आढळले. कुत्र्यांना विषारी इंजेक्शन दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या कृत्याला “जाणीवपूर्वक आणि क्रूर” ठरवत, संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
आरोपींना नोटिसा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पाच ग्रामसरपंचांसह एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर पांडेय नावाच्या व्यक्तीला ही हत्या करण्यासाठी नेमण्यात आल्याचा आरोप आहे. मृत कुत्र्यांचे मृतदेह गावांच्या बाहेर पुरण्यात आले होते. त्यानंतर पशुवैद्यकीय पथकाने ते बाहेर काढून शवविच्छेदन केले. मृत्यूचे नेमके कारण आणि वापरलेले विष निश्चित करण्यासाठी अंतर्गत अवयवांचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले असून, आरोपींना नोटिसा बजावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
आश्वासने 'पूर्ण'
गावातील सूत्रांनी सांगितले की, डिसेंबरमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांपूर्वी काही उमेदवारांनी भटके कुत्रे आणि माकडांच्या त्रासावर उपाय करण्याची आश्वासने दिली होती. निवडणूक जिंकल्यानंतर ती आश्वासने ‘पूर्ण’ करण्यासाठी हे कृत्य केल्याचा आरोप आहे. याआधीही, हनमकोंडा जिल्ह्यातील श्यामपेट आणि अरेपल्ली गावांमध्ये ६ ते ९ जानेवारीदरम्यान सुमारे ३०० भटक्या कुत्र्यांना विष देऊन ठार केल्याप्रकरणी दोन महिला सरपंच, त्यांचे पती, ग्रामपंचायत सचिव आणि नेमलेले कामगार अशा एकूण नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.