तेलंगणात माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन यांना मंत्रिपद

३१ ऑक्टोबरला अझरुद्दीन यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे. ११ नोव्हेंबर रोजी ज्युबली हिल्स विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. हीच बाब लक्षात घेता अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधित्त्व म्हणून अझरुद्दीन यांना मंत्रिपद दिले जाणार आहे, असे सांगितले आत आहे.
तेलंगणात माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन यांना मंत्रिपद | Photo : X
तेलंगणात माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन यांना मंत्रिपद | Photo : X
Published on

हैदराबाद : तेलंगणामध्ये लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असून मंत्रिमंडळात माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांचा समावेश केला जाणार असल्याचे वृत्त आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून तेलंगाणातील काँग्रेस सरकार नेमके कोणत्या नेत्याला मंत्री होण्याची संधी देणार, असे विचारले जात होते. असे असतानाच आता सत्ताधारी काँग्रेसने विधानपरिषदेवर आमदार म्हणून गेलेल्या माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांना मंत्रिपद देण्याचे ठरविले आहे. आगामी काळात होणारी ज्युबली हिल्स विधानसभा पोटनिवडणूक लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ३१ ऑक्टोबरला अझरुद्दीन यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे. ११ नोव्हेंबर रोजी ज्युबली हिल्स विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. हीच बाब लक्षात घेता अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधित्त्व म्हणून अझरुद्दीन यांना मंत्रिपद दिले जाणार आहे, असे सांगितले आत आहे. ज्युबली हिल्स या मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. ही निवडणूक जिंकायची असेल तर मुस्लिमांची मते मिळणे गरजेचे आहे. त्यामुळेच काँग्रेसने हा निर्णय घेतल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत.

ऑगस्टमध्ये आमदारकी

अझरुद्दीन यांना ऑगस्ट महिन्यात काँग्रेसने विधानपरिषदेत आमदारकी दिली होती. अझरुद्दीन हे राज्यपाल नियुक्त आमदार आहेत. त्यांचे नाव सुचवण्याआधी काँग्रेसने कोडांदारम आणि अमेर अली खान यांच्या नावांची राज्यपालांकडे शिफारस केली होती. मात्र राज्यपालांनी या नेत्यांची शिफारस फेटाळून लावली होती. त्यानंतर आंध्र प्रदेश सरकारने कोडांदारम आणि अझरुद्दीन यांचे नाव सुचवले होते. ही शिफारस मान्य केल्यानंतर आता अझरुद्दीन आमदार आहेत. लवकरच ते मंत्री होतील.

logo
marathi.freepressjournal.in