
शेतकऱ्यांना २४/७ मोफत वीज पुरवठा करणारे तेलंगणा हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे. शेतकऱ्यांना दर वर्षाला १० हजार रुपयांची मदत देणारी ‘रायतू बंधू’ ही योजनाही तेलंगणा सरकारनेच पहिल्यांदा आणली आहे.
तेलंगण सरकारने ६३ लाख शेतकऱ्यांना ५०४४८ कोटी रुपयांची मदत केली आहे. तसेच ‘रायतू भीमा’ योजनेत शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांना ५ लाखांची मदत देण्यात येते. या योजनेचा विमा हप्त्याचा खर्च तेलंगण सरकार उचलत आहे. विशेष म्हणजे, एलआयसीमार्फत १० दिवसांत याच्या दाव्याचा निपटारा केला जातो.
तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. त्यात ३५ लाख शेतकऱ्यांचे २२ हजार कोटींचे कर्ज माफ केले आहे. शेतकऱ्यांना जलसिंचनासाठी मोफत पाण्याची व्यवस्था सरकारने केली आहे.
शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध योजनांमुळे ‘तेलंगणा’ हे देशातील चांगले कृषी उत्पादन घेणारे राज्य बनले आहे. तेलंगणात २.१८ कोटी टन कृषी उत्पादन घेतले आहे. गेल्या आठ वर्षात राज्याचे कृषी उत्पादन आठ पटीने वाढले आहे. पंजाबच्या बरोबरीने राज्याचे कृषी उत्पादन पोहचले आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन खरेदीसाठी तेलंगणाने ७ हजार कृषी केंद्रे तयार केली आहेत. कापूस उत्पादनात तेलंगण पहिल्या क्रमांकावर पोहचले आहे. कारण शेतकऱ्यांना वेळच्यावेळी खत व बियाणांचा पुरवठा करण्यात आला आहे. तसेच भेसळयुक्त बियाणांचा पुरवठा केल्यास पुरवठादार व व्यापाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाते. अन्नधान्याच्या साठवणुकीची क्षमता ३१.९ लाख टनांवर नेली आहे.
५ एकर जमिनीचे २६०१ क्लस्टर बनवले आहेत. तसेच कृषी विस्तार अधिकाऱ्यांची नेमणूक त्यासाठी करण्यात आली आहे. शेतीसाठी सूक्ष्म जलसिंचन, स्प्रिंकल, ग्रीन हाऊस यंत्रणा, पॉली हाऊस आदी यंत्रणा तयार केल्या आहेत.
या सर्व योजनांमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ‘धरणी पोर्टल’वरून शेतकऱ्यांना जमीन नोंदणीची सुविधा ऑनलाईन उपलब्ध आहे. राज्यातील जमीनींची नोंदणीचे डिजीटलायझेशन केले आहे.