सोशल मीडियाच्या आजच्या जगात व्हायरल होण्यासाठी, जास्त लाईक आणि व्ह्यू मिळवण्यासाठी लोक कोणत्याही थराला जात असल्याचं वारंवार समोर येतंय. अशाच एका घटनेत, तेलंगणातील एका युट्यूबरने चक्क भारताचा राष्ट्रीय पक्षी मोराचं मांस शिजवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या व्यक्तीने 'पीकॉक करी'च्या रेसिपीचा व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ व्हायरल होताच त्याच्याविरोधात टीकेची झोड उठली आणि कारवाईची मागणी करण्यात आली. अखेरीस हा 'पराक्रम' आता त्याच्या चांगलाच अंगाशी आलाय.
कोडम प्रणय कुमार असे आरोपीचे नाव असून तो सिरसिल्ला जिल्ह्यातील तंगल्लापल्ली गावचा रहिवासी आहे. कुमारने ‘पीकॉक करी’ बनवताना आणि खातानाचा व्हिडिओ पोस्ट केला होता. यामुळे जास्त व्ह्यू मिळतील अशी त्याला अपेक्षा होती. त्याचा व्हिडिओ व्हायरल तर झाला पण त्यातील दृष्य बघून नेटकरी संतापले.
व्हिडिओ व्हायरल होताच घरी छापा
सोशल मीडिया वापरकर्त्यांनी व्हिडिओचा निषेध केला आणि कुमारवर बेकायदेशीरपणे वन्यजीव आणि राष्ट्रीय पक्षाची हत्या केल्याबद्द्ल कायदेशीर कारवाईची मागणी झाली. विरोध बघता स्थानिक अधिकाऱ्यांनी त्वरीत कारवाई केली आणि वन विभागाच्या पथकाने तंगल्लापल्ली गावात कुमारच्या घरी छापा टाकला. त्यांनी उरलेली करी हस्तगत केली आणि त्यात खरोखर मोराचे मांस आहे की नाही हे तपासण्यासाठी फॉरेन्सिक विश्लेषणासाठी नमुने गोळा केले.
पोलिसांनी घेतले ताब्यात
या गोंधळानंतर कुमारच्या यूट्यूब चॅनलवरून व्हिडिओ काढून टाकण्यात आला. स्थानिक पोलिसांनी कुमारला ताब्यात घेतले आणि करीसह त्याच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेच्या चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. करी मोराच्या मांसापासून बनवल्याचे चाचण्यांमध्ये सिद्ध झाल्यास, कुमारला गंभीर कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते.
कठोर कारवाई करणार
"आम्ही त्याच्यावर आणि अशा कारवायांमध्ये सामील असलेल्या प्रत्येकावर कठोर कारवाई करू. कुमारवर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे", असे सिरसिल्लाचे पोलिस अधीक्षक अखिल महाजन यांनी सांगितले. या व्हिडिओने संरक्षित प्रजातींच्या हत्येला प्रोत्साहन तर दिलेच आहे. शिवाय, वन्यजीवांचे रक्षण करणाऱ्या राष्ट्रीय कायद्यांचेही उल्लंघन केले आहे, असेही ते म्हणाले.