
मे महिना हा सर्वाधिक तापमानासाठी ओळखला जातो. राज्यासह देशभरात वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अशातच हवामान विभागाने देशभरात पुढील दोन दिवस तापमान वाढणार असल्याचे संकेत दिले आहेत. देशभरातील अनेक राज्यात तापमान वाढले असून पारा 45 अंशाच्या वर गेला आहे. त्यात अजून वाढ होण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
भारतीय हवामान खात्याने देशाची राजधानी दिल्लीत आज कमाल तापमान 42 अंश तर किमान तापमान 21 अंशावर राहणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. तर राजस्थान राज्यात 3 अंश सेल्सिअसने तापमान वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच बिकाने आणि जोधपूर जिल्ह्यात तापमान 54 अंशा पर्यंत वाढण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे.
अनेक राज्यात पारा 42 पार
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवस देशभरातील तापमानात वाढ होणार आहे. यात उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, बिहार, ओडिशा, पंजाब, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, हरियाणा, मध्यप्रदेश, झारखंड, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडूमध्ये तापमान 42 अंशाच्या पार जाण्याची शक्यता वर्तवली आहे. तर मणिपूर, मिझोरण, मेघायल, नागालँड, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा राज्याच्या काही भागात मुळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
केरळ, पश्चिम बंगाल आणि अंदमान निकोबार या ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर जम्मू- काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि लडाखमध्ये बर्फवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. विदर्भातील अकोल जिल्ह्यात 42.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पारा 40 अंशावर गेला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
अशी घ्या काळजी!
राज्यासह देशाच्या तापमानात वाढ झाली आहे. अशावेळी आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे आपल्याला चक्कर येण्याची तसेच अशक्तपणा जाणवण्याची शक्यता अधीक असते. अनेक ठिकाणी उष्माघाताने मृत्यू झाल्याच्या देखील बातम्या समोर येत आहेत. अशात शरीरात पाण्याची पातळी संतुलीत ठेवणे आवश्यक असते. त्यामुळे धावपळीचे काम करणाऱ्यांनी वेळोवेळी पाणी पिणे आवश्यक आहे. यासोबतच फळांचे रस, लिंबू पाणी पिणे देखील गरजेचे आहे. यामुळे उकाड्याच्या वेळी शरीरातून पाणी आणि क्षार बाहेर फेकले जाऊन शरीर थंड ठेवण्यास मदत होते.