उत्तर प्रदेशात रेल्वेचा भीषण अपघात ; ट्रेन थेट चढली प्लॅटफार्मवर, सुदैवाने जीवितहानी नाही

अपघातापूर्वीच सर्व प्रवासी ट्रेनमधून उतरले असल्याने एक मोठा अनर्थ टळला आहे.
उत्तर प्रदेशात रेल्वेचा भीषण अपघात ; ट्रेन थेट चढली प्लॅटफार्मवर, सुदैवाने जीवितहानी नाही

उत्तर प्रदेशातील मथुरेत रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. मंगळवारी रात्री उत्तर प्रदेशातील मथुरा रेल्वे स्टेशनवर ट्रेन रूळावरुन थेट प्लॅटफॉर्मवर चढली. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना ज्यावेळी घडली त्यावेळी ट्रेनमध्ये कोणतेही प्रवासी नव्हते. अपघातापूर्वीच सर्व प्रवासी ट्रेनमधून उतरले होते. त्यामुळे एक मोठा अनर्थ टळला. मथुरा हे शेवटचं स्थानक असल्यामुळे तिथे ट्रेन बंद करुन ठेवल्या जातात. पण काल मोटरमनकडून एक चूक घडली आणि त्यामुळे हा अपघात घडला. मोटरमननं चुकून ब्रेक ऐवजी एक्सीलेटर दाबला त्यामुळेच हा अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे. मोटरमननं एक्सीलेटर दिल्यामुळे ट्रेन थेट रुळावरुन प्लॅटफॉर्मवर चढली.

दरम्यान, ही मोटरमनची चूक होती की, तांत्रिक बिघाड हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त समोर आलेलं नाही. या घटनेबद्दल रेल्वे प्रशासनाचा कोणताही अधिकारी कॅमेरासमोर आणि लोकांन समोर काहीही बोलण्यास तयार नाही. मात्र, रेल्वेचं इंजिन हटवल्यानंतरच परिस्थिती स्पष्ट सांगता येईल, असं सांगितलं जातं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ईएमयू ट्रेन शकूर बस्ती येथून येतं होती. रात्री 10.49 सुमारास ट्रेन मथुरा जंक्शनवर पोहोचली, ज्यानंतर ट्रेनमधील सर्व प्रवासी उतरले. त्यानंतर ट्रेन सुरू झाली आणि थेट ट्रॅकवरुन घसरुन थेट प्लॅटफॉर्मवर चढली. या भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे, त्यामध्ये पाहायला मिळतंय की, ट्रेनचं इंजिन प्लॅटफॉर्मवर चढलेलं आहे, ज्यामुळे प्लॅटफॉर्म तुटला असून ट्रेनचा पुढचा भागही काही प्रमाणात तुटलेला आहे. ट्रेन प्लॅटफॉर्मवर कशी पोहोचली याचा तपास केला जातं आहे. या घटनेमुळे अप मार्गावरील काही रेल्वे गाड्यांवर खूप परिणाम झाला आहे. प्लॅटफॉर्मवरून ट्रेन हटवण्याचं काम सुरू केलं असून ट्रेन हटवल्यानंतर अप मार्गावरील गाड्या पुन्हा सुरू केल्या जातील, असं देखील सांगितलं जातं आहे.

logo
marathi.freepressjournal.in