जम्मू-काश्मीरमध्ये भाविकांवर दहशतवादी हल्ला; १० ठार, ३३ जखमी

जम्मू-काश्मीरमध्ये भाविकांवर दहशतवादी हल्ला; १० ठार, ३३ जखमी

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सुरू असतानाच जम्मू-काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार करून नृशंस हत्याकांड घडवले. दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारानंतर भाविकांची बस दरीत कोसळली.

श्रीनगर : केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सुरू असतानाच जम्मू-काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार करून नृशंस हत्याकांड घडवले. दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारानंतर भाविकांची बस दरीत कोसळली. यात १० भाविक ठार झाले असून ३३ जण जखमी झाले आहेत. ही घटना जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात घडली.

रियासी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विशेष महाजन यांनी सांगितले की, शिवखोरी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ही बस कटरा येथे निघालेली असताना सायंकाळी ६.१५ वाजता दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार केला. यानंतर बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला आहे.

प्राथमिक अंदाजानुसार, ही बस जंगलात शिरल्यानंतर तेथे लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी बसवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबाराने घाबरलेल्या बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व बस दरीत कोसळली.

लष्कर, सीआरपीएफ व जम्मू-काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांना घेरण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे. दरम्यान, घटनास्थळी मदतीसाठी रुग्णवाहिका दाखल झाल्या असून, मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. यासाठी पोलीस, लष्कर व निमलष्करी दलाच्या जवानांचीही मदत घेतली जात आहे.

ही दुर्घटना इतकी भीषण होती की, बस दरीत कोसळल्यानंतर त्यातील भाविक मोठमोठ्या दगडांवर आपटले गेले. मृतांमध्ये महिला व पुरुषांचा समावेश आहे.

रियासी जिल्ह्याचे विशेष पोलीस अधीक्षक मोहिता शर्मा यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी भाविकांच्या बसवर हल्ला केला. राजौरी, पूँछ व रियासी येथील उंच भागात दहशतवादी लपल्याचे सूत्रांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in