जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद अखेरच्या घटका मोजत आहे. घराणेशाहीच्या राजकारणाने या सुंदर प्रदेशाचा विनाश केला आहे. त्यामुळे या घराणेशाहीला शह देण्यासाठी नवे नेतृत्व निर्माण करण्याचा आपल्या सरकारचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे केले.
जम्मू प्रदेशातील दोडा जिल्ह्यातील भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मोदी बोलत होते. जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याच्या आश्वासनाचाही यावेळी त्यांनी पुनरुच्चार केला आणि येथे नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस आणि पीडीपी सरकार सत्तेवर येण्याविरोधात जनतेला सावध केले.
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वीची मोदी यांची ही पहिलीच जाहीर सभा आहे. पहिल्या टप्याचे मतदान १८ सप्टेंबर रोजी होणार असून त्यानंतर दुसऱ्या टप्याचे मतदान २५ सप्टेंबर रोजी आणि अखेरच्या टप्प्याचे मतदान १ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
या वेळी होणारी निवडणूक जम्मू-काश्मीरचे भवितव्य ठरवणारी आहे. घराणेशाहीच्या राजकारणाने या सुंदर प्रदेशाचा विनाश केला आहे. स्वातंत्र्यापासून जम्मू-काश्मीर हे परकीय शक्तींचे लक्ष्य राहिले आहे. काही जणांना आपल्या मुलाबाळांनाच पुढे आणायचेय आणि त्यामुळे ते नव्या नेतृत्वाला पुढे येऊ देत नाहीत, असेही पंतप्रधान म्हणाले.
बारामुल्लातील चकमकीत ३ दहशतवादी ठार
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दलांसमवेत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. ही चकमक शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू होती.
बारामुल्ला जिल्ह्यातील पत्तन परिसरात शुक्रवारी रात्री चाक तापर क्रिती येथे वेढा घालून सुरक्षा दलांनी शोधमोहीम हाती घेतली होती. त्यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला असता चकमक उडाली आणि त्यामध्ये तीन दहशतवादी ठार झाले. हे दहशतवादी कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत त्याचा तपास केला जात आहे.