जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; चार जवान शहीद

जम्मू काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील मच्छेडी भागात आज सायंकाळी हा हल्ला झाला.
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; चार जवान शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला आहे. जम्मू काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील मच्छेडी भागात आज सायंकाळी हा हल्ला झाला. लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात चार जवान शहीद झाले असून चार जण जखमी झाले आहेत. लष्काराचे जवान आणि दहशतवादी यांच्यातील चकमक सुरु असल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांत मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात रविवारी दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्याला लक्ष केलं होतं. या दहशतवादी हल्यात एक जवान शहीद झाला होता. दरम्यान ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्याला लक्ष केलं आहे.

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, कठुआ जिल्ह्यातील मच्छेडी भागात हा हल्ला झाला आहे. लष्कराचे पथक या भागातून जात असताना टेकडीवर लपलेल्या दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर अचानक गोळीबार सुरु केला. तसेच हॅण्डग्रेनेडही फेकले. या हल्ल्याला भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिले.

या चकमकीत चार जवान शहीद झाले, तर चार जवान जखमी झाले. जखमी जवानांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in