आशिष सिंह/मुंबई : देशात अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेचा दिवस जसजसा जवळ येत आहे तसतसा देशवासीयांचा उत्साह वाढत आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला गालबोट लागू नये म्हणून सुरक्षा यंत्रणा डोळ्यात तेल घालून सज्ज आहेत. मात्र, २२ जानेवारीला होणाऱ्या या 'प्राणप्रतिष्ठा' सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशातील सुरक्षा यंत्रणांनी अल-कायदाच्या दहशतवादी कारवायांच्या पॉकेटबुकची माहिती सरकारी सुरक्षा यंत्रणांना दिली आहे. हे दहशतवादी हँडबुक 'लोन मुजाहिद पॉकेटबुक' म्हणून ओळखले जाते. ते संशयित इसिस हँडलर्सनी एका सोशल मीडिया ॲपवर टाकले आहे. भारतातील तरुणांची दिशाभूल करून संभाव्य हल्ल्यासाठी त्यांना तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.
अयोध्येत २२ जानेवारीला २ लाख भक्त येणार आहेत. यावेळी संभाव्य हल्ल्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना अधिक दक्ष राहावे लागणार आहे. अयोध्येतील संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा आढावा घेण्याचे काम सुरक्षा व गुप्तचर यंत्रणा करत आहेत. ‘इसिस’चा हँडलर अबू मोहम्मद याच्याकडे संशयाची सुई वळत आहे. त्याचा ‘लोन मुजाहिद पॉकेटबुक’ नावाचा लेख इन्स्टाग्रामवर आढळला आहे. या लेखात पार्किंग केलेल्या गाड्या, रस्ते अपघात, जंगलाला आग लावणे, इमारत कोसळवणे, रिमोट कंट्रोलने स्फोट घडवणे आदी बाब त्यात आहेत. जिहादचा वापर करून काफिरचा नि:पात करणे आदी उद्देश त्यात व्यक्त केले आहेत.
‘लोन मुजाहिद पॉकेटबुक’शी संबंधिताची ओळख तपास यंत्रणांनी पटवली आहे. या पॉकेटबुकमधून रेल्वे मार्ग उडवणे आदी कट आखण्याचे मार्गदर्शन भारतीय तरुणांना करण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकृत सूत्रांनी ‘नाव न सांगण्याच्या अटीवर’ सांगितले की, अल-कायदाचे ‘लोन मुजाहिद पॉकेटबुक’ हे पहिल्यांदा २०१३ मध्ये प्रकाशित झाले. त्यानंतर त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. अल-कायदातर्फे ऑनलाईन अपप्रचार केला जात आहे. या पॉकेटबुकमधील मजकूर धोकादायक आहे. पाश्चात्य देशांमध्ये, पुस्तकातील पाने किंवा पॉकेटबुकच्या कागदाचे कटिंग बाळगणे किंवा शेअर करणे, हे संशयाचे कारण मानले जाते. या अपप्रचार करणाऱ्या पॉकेटबुकद्वारे, अल-कायदाने पाश्चात्त्य देशांमध्ये लहान-लहान दहशतवादी हल्ले करण्यासाठी तरुणांना प्रवृत्त केले. मोटार किंवा स्वयंपाकाचे तेल, साखर आणि काडीपेटी यांसारख्या सहज मिळू शकणाऱ्या साहित्याचा वापर करून मोठे अपघात, विनाशकारी आग आणि प्राणघातक स्फोट घडवून आणण्यासाठी या पुस्तकात टिप देण्यात आल्या आहेत. उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, हे पॉकेटबुक सोशल मीडियावरून प्रसारित होणे म्हणजे अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याच्या दृष्टीने धोक्याचे आहे. याचा धोका केवळ अयोध्येपुरता नाही. मुंबई, दिल्ली, कोलकाता, राजस्थान, मध्य प्रदेशसहित प्रत्येक प्रार्थनास्थळ धोक्याच्या इशाऱ्यावर आहे.