
नवी दिल्ली : पहलगाममधील बैसरन पठारावर निष्पाप पर्यटकांच्या हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा भारतीय लष्कराने २८ जुलै रोजी खात्मा केला. पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या आणि त्याचे दोन साथीदार दहशतवादी एका लष्करी चकमकीत मारले गेले. हे दहशतवादी पहलगाम हल्ल्यानंतर अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याच्या तयारीत होते, अशी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
एका वृत्तवाहिनीने विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. लष्कराच्या ‘ऑपरेशन महादेव’मध्ये मारले गेलेले पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अमरनाथ यात्रेकरूंना लक्ष्य करण्याच्या तयारीत होते. सूत्रांनी सांगितले की, जे दहशतवादी ‘ऑपरेशन महादेव’मध्ये मारले गेले, त्यांचे पुढील लक्ष्य अमरनाथ यात्रा होते. अमरनाथ यात्रा सुरू असून, यात्रेदरम्यान मोठा हल्ला करण्याच्या तयारीत हे दहशतवादी होते. ‘ऑपरेशन महादेव’च्या यशामुळे दहशतवाद्यांचे पुढील हल्ल्याचे मनसुबे उधळले गेले.
‘त्या’ दहशतवाद्यांची कुंडली
जम्मू-काश्मीरमधील ‘ऑपरेशन महादेव’मध्ये ठार झालेल्या तिन्ही दहशतवाद्यांची संपूर्ण 'कुंडली' आता समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत सुलेमान, अफगाणी आणि जिब्रान या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.
भारतीय लष्कर, केंद्रीय सुरक्षा दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या या ‘ऑपरेशन महादेव’मध्ये त्यांना ठार करण्यात आले. संसदेत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान अमित शहा यांनी सांगितले की, या दहशतवाद्यांकडून ज्या गोळ्या मिळाल्या आहेत, त्याच गोळ्यांचा वापर पहलगाममध्ये निष्पाप लोकांना मारण्यासाठी करण्यात आला होता.
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेला सुलेमान हा पाकिस्तानी वंशाचा होता. लष्कर-ए-तैयबामध्ये सामील होण्यापूर्वी सुलेमान पाकिस्तानी सैन्यात कमांडर होता. त्याला पहलगाम हल्ल्यापूर्वी ‘पीओके’मध्ये (पाकव्याप्त काश्मीरमध्ये) प्रशिक्षण देण्यात आले होते. सुलेमान २०२२ पासून जम्मू-काश्मीरमध्ये सक्रिय होता. तर जिब्रान हा लष्कर-ए-तैयबाचा 'ए-ग्रेड'चा कमांडर होता. पाकिस्तानी वंशाचा जिब्रान जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता. गेल्या वर्षी सोनमर्ग येथे झालेल्या हल्ल्याची जबाबदारीही जिब्रानने स्वीकारली होती. अफगाणी नावाचा दहशतवादीही पाकिस्तानचाच रहिवासी होता. अफगाणीही लष्कर-ए-तैयबाचा 'ए-श्रेणी'चा कमांडर होता. अफगाणीनेही पहलगाममध्ये लोकांवर गोळ्या झाडल्या होत्या आणि त्यानंतर अफगाणीने इतर साथीदारांसोबत तिथे जश्नही साजरा केला होता.